‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ नागपुरात फुटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 03:17 PM2023-10-14T15:17:16+5:302023-10-14T15:17:59+5:30
‘इंडिया’ आघाडीच्या संयुक्त जाहीर सभांची सुरुवात नागपूरपासून करण्याचे ठरले आहे.
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत केंद्रातील सरकारला आव्हान देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या २६ पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ नागपूरच्या संघभूमीत फुटणार आहे. ‘इंडिया’ आघाडीतील बड्या नेत्यांचा सहभाग असलेली ही जाहीर सभा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या संयुक्त जाहीर सभांची सुरुवात नागपूरपासून करण्याचे ठरले आहे. पण, पूर आल्यामुळे हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आणि आता नोव्हेंबर महिन्यात ही रॅली आयोजित करण्यात येत असल्याचे समन्वय समितीचे सदस्य, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना - ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट या रॅलीचे आयोजन करणार
आहेत.
‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये घेण्याचे ठरले होते. पण मध्य प्रदेशात होत असलेली विधानसभेची निवडणूक, सनातन धर्मावर द्रमुकचे नेते उदयनिधी स्टालिन यांनी केलेली टीका तसेच ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष आम आदमी पार्टीने मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ही रॅली स्थगित करायला लावली होती.