देशाला जोडणारी, देशाची लाईफलाईन म्हणजे भारतीय रेल्वे. अगदी ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत या रेल्वेचं जाळ पसरलं आहे. कमी भाडे आकारणी करत दूरदूरवर पोहोचवणारी भारतीय रेल्वे आहे. या रेल्वेचं महत्त्व आणि खासियत अगणीत आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकाला एक त्या त्या गावचं किंवा तेथील लोकांच्या भावनांचं एक विशेष महत्त्व आहे. तसेच, अनेक ठिकाणची रेल्वे स्थानकं ही ऐतिहासिक वारसा ठरली आहेत. उत्तर प्रदेशच्या एका रेल्वे स्थानकाची कथा निराळीच आहे. कारण, या रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म दोन जिल्ह्यात येतो.
उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात जिल्ह्यातील हे रेल्वे स्टेशन असून स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर तिचा अर्धा भाग एका जिल्ह्यात आणि दुसरा अर्धा भाग दुसऱ्या जिल्ह्यात असतो. देशातील हे तिसरं रेल्वे स्टेशन आहे, ज्याची गोष्ट अशी रंजक आहे. दिल्ली-हावडा रेल्वे रूट जे कानपूर देहात आणि औरेया या दोन जिल्ह्यातून जातो. या दोन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवरील कंचौसी हे रेल्वे स्टेशन दोन जिल्ह्याच्या सीमांमध्ये आहे. त्यामुळेच, येथे थांबणारी रेल्वे गाडी अर्धी कानपूर देहात तर अर्धी औरेया जिल्ह्यात उभी असते. या रेल्वे स्टेशनचं ऑफिस कानपूर देहात जिल्ह्यात असून प्लटॅफॉर्मचे शेटवटचे टोक औरेया जिल्ह्यातील सीमांत येते.
काही दिवसांपूर्वी या स्थानकावर केवळ पॅसेंजर ट्रेन येत असत. मात्र, नुकतेच मालदा टाऊन येथून दिल्लीला जाणारी फरक्का एक्सप्रेस 6 महिन्यांच्या ट्रायल बेसीसवर येथे थांबा घेत आहे. या ट्रेनला येथे थांबा मिळाल्याने नागरिकांची, प्रवाशांची चांगली सोय होत असल्याचं येथील स्थानिकाचं म्हणणं आहे.