जम्मूमधील कथुआ जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका शाळेमध्ये विद्यार्थ्याने फळ्यावर जय श्री राम लिहिल्याने शिक्षकांने त्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर कथुआ जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिक्षक आणि प्रिन्सिपलविरोधात विरोध तीव्र आंदोलन झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी बनी हायर सेकंडरी स्कूलच्या एका विद्यार्थ्याने वर्गातील फळ्यावर जय श्री राम लिहिलं. ते पाहिल्यानंतर कथितपणे अल्पसंख्याक समुदायातील शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला मारहाण केली. त्यानंतर तो शिक्षक त्या विद्यार्थ्याला प्रिंसिपलच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. तिथेही विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बनी येथील पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ३४२, ५०४, ५०६ आणि जुवेनाइल जस्टिस अॅक्टमधील कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथेही अशीच घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका वर्गामध्ये बसलेली दिसत आहे. तर समोर एक मुलगा रडत आहे. तर वर्गात बसलेले इतर विद्यार्थी एक एक करून शिक्षकांच्या आज्ञेचं पालन करत त्याला मारत आहेत. या व्हिडीओमध्ये मारहाण झालेला विद्यार्थी हा मुस्लिम समाजातील आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी, असदुद्दीन ओवेसा आणि कुमार विश्वास यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.