चेतन धनुरे
दावणगेरे : कर्नाटकच्या राजसत्तेचा मार्ग हा मध्य कर्नाटकातून जातो, अशी वदंता या भागात आहे. चार दिग्गज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन् अनेक मंत्री या भागात होऊन गेले. मात्र यावेळच्या निवडणुकीत राज्याच्या राजकारणात स्वतःचा रुतबा असलेला एकही दिग्गज नसल्याने मध्य कर्नाटकच्या राजसत्तेचा सूर्य अस्ताला जात असल्याची रुखरुख लोकांमध्ये जाणवते आहे.
कर्नाटकात प्रचारतोफा आज थंडावणार, सत्ता टिकवण्यासाठी भाजपची शक्ती पणाला
मध्य कर्नाटकात दावणगेरे, शिमोगा आणि चित्रदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांनी काँग्रेस, भाजप व जेडीएस या तिन्ही पक्षांना त्या-त्या वेळी भरभरून दिले. आधी काँग्रेस नंतर जेडीएस व आता भाजपच्या पदरी एकतर्फी कौल दिला आहे. यातूनच जेडीएसचे नेते जे. एच. पटेल, भाजपचे येदियुरप्पा, काँग्रेसचे बंगारप्पा, मंजप्पा यांना मुख्यमंत्र्यांचा मुकुट मिळाला. उपमुख्यमंत्री व विविध मंत्रिपदेही या भागाला भरभरून मिळाली. मात्र सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत एकाही पक्षाचे दिग्गज म्हणावे असे नेते लढाईत नाहीत.
मागच्या टर्मला २१ पैकी १७ जागा भाजपला मिळूनही किरकोळ मंत्रिपदे वाट्याला आली. सत्तेत वाटा कमी मिळाला तरी येदियुरप्पांच्या प्रभावामुळे विकासनिधीत फारशी अडचण आली नाही. मात्र आता चित्र वेगळे आहे.
दीर्घकाळ सत्ताकेंद्र मध्य कर्नाटकात राहिल्याने येथील विकासाला चालना मिळाली. आता पॉवरफुल नेत्यांची उणीव जाणवेल, असे मत दावणगेरे येथील राजकीय अभ्यासक प्रा. एस. शरण व्यक्त करतात. तर या भागात सुरू तसेच मंजूर असलेल्या सिंचन, रेल्वे प्रकल्पांना फटका बसू शकेल, असे मत राजकीय विश्लेषक मंजुनाथ यांनी मांडले.
अनेक जण दिवंगत
झाले तर काही निवृत्त. यामुळे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये सोडा; पण चर्चेतही कोणी नाहीत, याची सल येथील लोकांमध्ये दाटते आहे.