सुप्रीम कोर्टाला मिळणार 3 नवीन न्यायाधीश, कॉलेजियमने या तिघांच्या नावाची केली शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:39 PM2023-11-06T21:39:25+5:302023-11-06T21:41:00+5:30
Supreme Court Collegium: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने दिल्ली, राजस्थान आणि गुवाहाटी हाय कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नावाची शिफारस केली आहे.
Supreme Court Collegium: सर्वोच्च न्यायालयात आणखी तीन न्यायाधीशांची भर पडणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने (Supreme Court Collegium) सोमवारी (6 नोव्हेंबर) उच्च न्यायालयाच्या तीन मुख्य न्यायमूर्तींना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती देण्याची शिफारस केली आहे.
यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऑगस्टिन जॉर्ज मसीह आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संदीप मेहता यांच्या नावांचा समावेश आहे.
Supreme Court Collegium recommends names of three new judges for the appointment of apex court judges.
— ANI (@ANI) November 6, 2023
Delhi High Court Chief Justice Satish Chandra Sharma, Rajasthan High Court Chief Justice Augustine George Masih and Gauhati High Court Chief Justice Sandeep Mehta recommended… pic.twitter.com/QpK9XTlEk9
सर्वोच्च न्यायालयात किती पदे रिक्त आहेत?
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण मंजूर पदे 34 असून त्यापैकी 3 पदे रिक्त आहेत. या कॉलेजियममध्ये सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश आहे.
कोण आहेत सतीश चंद्र शर्मा?
सतीश चंद्र शर्मा यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1961 रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झाला. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी शर्मा मध्य प्रदेश उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून कार्यरत होते. त्यानंतर शर्मा यांना 2008 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बनवण्यात आले. दोन वर्षांनंतर, म्हणजे 2010 मध्ये त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांची 28 जून 2022 रोजी नियुक्ती करण्यात आली.
ऑगस्टीन जॉर्ज मसीह कोण आहे?
ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांचा जन्म 12 मार्च 1693 रोजी झाला. 10 जुलै 2008 रोजी मसीह यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बनवण्यात आले. त्यानंतर 14 जानेवारी 2011 रोजी त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. मसीह 30 मे 2023 पासून राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदावर कार्यरत आहेत.
संदीप मेहता यांचा परिचय
संदीप मेहता यांना 30 मे 2011 रोजी राजस्थान उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बनवण्यात आले आणि त्यानंतर 6 फेब्रुवारी 2013 रोजी त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. मेहता हे 15 फेब्रुवारी 2023 पासून गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत.