सर्व्हेतून राजस्थानात भाजप विजयाची भविष्यवाणी, पण दोन कारणांनी टेन्शन वाढवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 02:54 PM2023-07-28T14:54:10+5:302023-07-28T14:55:18+5:30
सर्वेक्षणात अशाही काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या भाजपसाठी टेन्शनचा विषय ठरू शकतात तर काँग्रेससाठी दिलासादायक ठरू शकतात.
राजस्थानात लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र यातच, एका ताज्या सर्व्हेने भाजपला राजस्थानात सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते, अशी भविष्यवाणी केली आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वात प्रचाराची सुरुवात करणाऱ्या भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, सर्वेक्षणात अशाही काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या भाजपसाठी टेन्शनचा विषय ठरू शकतात तर काँग्रेससाठी दिलासादायक ठरू शकतात.
सर्व्हेचा दावा -
एबीपी न्यूजने सी व्होटरसह गुरुवारी जारी केलेल्या ओपिनियन पोलमध्ये यावेळी राजस्थानात भाजपचे सरकार येईल, अशी भविष्यवाणी केली आहे. सर्व्हेतील आकडेवारीनुसार, 200 जागांच्या या विधानसभेत भाजपला 109-119 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 78-88 जागा मिलण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 1-5 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाला 46 टक्के मतं मिलू शकतात. तर काँग्रेसला 41 टक्के आणि इतरांच्या खात्यात 13 टक्के मतं जाण्याचा अंदाज आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी गेहलोत पहिल्या पसंतीचे उमेदवार -
या सर्व्हेमध्ये एका बाजूला भाजपच्या विजयाची भविष्यवाणी केली गेली असली तरी, दुसऱ्या बाजूला मात्र अशोक गेहलोतांची जादूही दिसत आहे. ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरू शकते. सर्व्हेमध्ये लोकांना प्रश्न करण्यात आला की, मुख्यमंत्री पदासाठी आपली पहिली पसंती कुणाला? यावर 35 टक्के लोकांनी गेहलोतांना पसंती दर्शवली. तर २५ टक्के लोकांना वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शविली आहे. तसेच, सचिन पायलट यांना १९ टक्के लोकांना पसंती दर्शवली आहे.
याचबरोबर, ९ टक्के लोकांनी भाजप खासदार आणि केंद्रीय गजेंद्र सिंह शेखावत यांना मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती असल्याचे सांगितले. याशिवाय सात टक्के लोकांना भाजप प्रवक्ते राज्यवर्धन सिंह राठोड यांना मुख्यमंत्रीपदी बघायचे आहे.
41 टक्के लोक गेहलोतांच्या कामावर समाधानी -
सर्व्हेतील भाजपचे टेन्शन वाढवू शकते अशी आणकी एक गोष्ट म्हणजे, राजस्थानातील बहुतांश लोकांनी गेहलोतांच्या कामावर समाधानी असल्याचे म्हटले आहे. तब्बल 41 टक्के लोकांनी गेहलोतांच्या कामावर अत्यंत समाधानी असल्याचे म्हटले आहे. याच वेळी, 35 टक्के लोकांनी कमी समाधानी असल्याचे म्हटले आहे, 21 टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे म्हटले आहे. तर 3 टक्के लोकांनी 'माहित नाही' असे म्हटले आहे.