मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या समर्थकांचेही दोन गट पडले आहेत. शरद पवार यांचे सर्वात निकटवर्तीय सहकारी प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे या फुटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी अनेकदा शरद पवारांच्या राजकीय भूमिकांवर भाष्य केलं. तर, सन १९९६ मध्ये शरद पवार यांची पंतप्रधान पदाची संधी हुकल्याचंही जाहीरपणे सांगतिलं होतं. आता, पटेल यांनी तो १९९६ चा किस्साच सांगितला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सातत्याने होत असते. पण, शरद पवार यांनी वेळोवेळी याला नकार दिला आहे. अशातच काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना चालून आलेली पंतप्रधानपदाची संधी त्यांनी का डावलली, हा प्रश्न मला कायम पडतो, असे म्हटले.
सन १९९६ साली ११ महिन्यांत एच.डी. देवेगौडा यांचं सरकार पडणार असल्याचं निश्चित झालं होतं. त्यावेळी, स्वत: पंतप्रधानांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतलं. मी राजीनामा देतो, आता शरद पवार यांना नेतृत्त्व करायला सांगा, त्यांना पंतप्रधानपद घ्यायला सांगा, असा निरोप तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांना माझ्याकडे दिला होती. विशेष म्हणजे, हवं तर मी आत्ता तुझ्याकडे राजीनामा देऊ का? असेही ते म्हणाले. त्यावेळी, मी नम्रपणे आपण देशाचे पंतप्रधान आहात, माझ्याकडे राजीनामा देऊ नका, असे म्हटल्याचा किस्सा प्रफुल्ल पटेल यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
एच.डी. देवेगौडा यांना दिलेला पाठिंबा काँग्रेसकडून काढण्यात येत होता. तेव्हा, शरद पवारांना पाठिंबा देत १०० पेक्षा जास्त खासदार एकत्र आले होते. शरद पवारांचे कट्टर विरोधकही यावेळी शरद पवारांसाठी जमले होते, तिथं त्यांनी भाषणंही केली. पवारसाहेब आता तुम्ही नेतृत्त्व घेतलं पाहिजे, सिताराम केसरीची सुट्टी करा आणि तुम्ही पंतप्रधान व्हा, असं सर्वच खासदारांचा सूर होता. तर, एच.डी. देवेगौडा यांनीही शरद पवारांनीच नेतृत्त्व करावं, अशी साद माझ्याकडे घातली होती. त्यावेळी, शरद पवारच १०१ टक्के काँग्रेसचे पंतप्रधान झाले असते. मात्र, शरद पवार यांनी त्यावेळी, नकार दिला, तो नेमकं का दिला हे मला माहिती नाही, असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वीही प्रफुल्ल पटेल यांनी हा दावा केला होता. “एच. डी. देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं.