सिद्धरामय्यांच्या शिरावर कर्नाटकचा काटेरी मुकुट; खरगे, राहुल व शिवकुमार समर्थकांना स्थान देण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 11:25 AM2023-05-19T11:25:13+5:302023-05-19T11:25:55+5:30
काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी अधिकृतरीत्या कर्नाटकचा निर्णय जाहीर केला व त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सिद्धरामय्या व शिवकुमार यांचे हात उंचावून कर्नाटकच्या निर्णयावर काँग्रेस नेतृत्वाचे शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले.
नवी दिल्ली : काँग्रेसने बुधवारी रात्री उशिरा कर्नाटकचा मुकुट सिद्धरामय्या यांना दिला. डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रिपद व लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्ष राहण्यावर राजी झाले. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी अधिकृतरीत्या कर्नाटकचा निर्णय जाहीर केला व त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सिद्धरामय्या व शिवकुमार यांचे हात उंचावून कर्नाटकच्या निर्णयावर काँग्रेस नेतृत्वाचे शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले.
बुधवारी रात्री उशिरा के. सी. वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यात कर्नाटकचे सरचिटणीस प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला व डी. के. शिवकुमार सहभागी झाले होते. तेथूनच काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवर डी. के. शिवकुमार यांची चर्चा घडवून आणली. शिवकुमार राजी झाल्यावर बैठकीतील तिन्ही नेते रात्री एक वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी गेले. तेथे अंतिम फैसला झाला.
उद्या शपथविधी
शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीमध्ये मंत्रिमंडळ गठनाबाबत चर्चा होईल. लोकमतला सूत्रांनी सांगितले की, शनिवारी २८ मंत्री शपथ घेतील. सिद्धरामय्या यांना कर्नाटकचा मुकुट, तर घालण्यात आला; परंतु तो काटेरी यासाठी आहे की, खरगे, शिवकुमार, सुरजेवाला व काँग्रेस नेतृत्वाच्या सर्व लोकांना त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे लागेल.