सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे आहेत. मध्य प्रदेशमधून एक खतरनाक खबर येत आहे. सिंगरौली जिल्ह्यातील एका पंचायत सचिवाच्या तीन पत्नी आहेत. या तिन्ही पत्नी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभ्या ठाकल्या आहेत. मजेशीर बाब म्हणजे, दोन पत्नी या एकाच ग्रामपंचायतीतून सरपंच निवडणुकीसाठी एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. तर तिसरी सदस्य पदासाठी उभी राहिली आहे.
यामुळे बिचाऱ्या या पंचायत सचिवाची चांगलीच गोची झाली आहे. त्याच्यावर तिन्ही पत्नींनी आपलाच प्रचार करण्यासाठी दबाव टाकला आहे. तो एवढा पेचात अडकला आहे की त्याने घरच नाही तर गावही सोडून पलायन केले आहे.
देवसरमधील घोंघरा ग्रा. पंचायतीमध्ये सुखराम सिंह हा सचिव आहे. त्याच्या तीन पत्नी आहेत. सुखरामची पहिली पत्नी देवसरमधून सदस्य पदासाठी निवडणूक लढवत आहे. दिसरी पत्नी कसुमकली आणि तिसरी पत्नी गीता सिंह या पिपरखड़ ग्राम पंचायत मध्ये सरपंच पदासाठी उभ्या ठाकल्या आहेत. कोणाही जिंकले तरी सरपंच पद घरातच असेल, अशी पाचही बोटे तुपात असतील अशा परिस्थितीत असलेला नवरा मात्र घर सोडून पळाला आहे.
या दोघींनाही वाटतेय सुखरामने आपलाच प्रचार करावा. हे प्रकरण आता जनपदच्या सीईओंकडे जाऊन पोहोचले आहे. त्यांनी हिंदू कायद्यानुसार तिन्ही महिलांना एकाच व्यक्तीच्या पत्नी असल्याने नोटीस दिली आहे. परंतू अद्याप त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला नाही. तसेच या महिलांनी देखील कोणतीही तक्रार दिलेली नाहीय. यामुळे जर पत्नींना कोणती समस्या नसेल तर आम्ही देखील कारवाई करू शकत नाही, जेव्हा तक्रार येईल तेव्हा कारवाई केली जाईल असे सीईओ बीके सिंह यांनी म्हटले आहे.