'राजद' प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पूर्णियामध्ये आयोजित महाआघाडीच्या रॅलीला संबोधित केले. "आम्ही आणि नितीश एक झाले आहोत. कोणत्याही भ्रमात राहू नका. ही युती विचारधारेची आहे. यानंतर बिहारमध्ये २०२४-२५ च्या निवडणुकीचे रेकॉर्ड मोडले जातील. आपल्याला संविधान आणि देश वाचवायचा आहे. बिहारला पुढे न्यायचे आहे", असे लालू म्हणाले.
लालू यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारमध्ये ज्या प्रकारे युती आहे. त्याचप्रमाणे देशातही युती आहे. ज्यामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत. ज्याची विचारधारा वेगळी आहे. प्रत्येकाचा ध्वज वेगळा असतो. असं असलं तरी आपण सर्व एक आहोत. हीच आमची ताकद आणि आमची ओळख आहे. तुमच्या आशीर्वादामुळे लालू यादवजी आता ठीक आहेत. ते बरे होऊन आज आपल्यासमोर बोलत आहेत. त्यांचा छळ करण्यात आला. पण ते घाबरले नाहीत, जातीयवादी शक्तींसमोर गुडघे टेकले नाहीत. त्यांचा सामना केला, असंही तेजस्वी यादव म्हणाले.
बिहारच्या एकदिवसीय दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालू-नितीश यांच्या युतीचा खरपूस समाचार घेतला होता. राजद आणि जदयूची मैत्री तेल आणि पाण्यासारखी आहे, दोघांमध्ये काहीच जुळत नाही. दोघेही केवळ अर्थकारणासाठी एकत्र आले आहेत. नितीश कुमार यांनी पंतप्रधान होण्यासाठी बिहारचे विभाजन केलं आहे, असं अमित शाह म्हणाले होते. त्यानंतर लालू यादव यांनी अमित शाह यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.
आमचे सरकार 10 लाख नोकऱ्या देणार - तेजस्वी"१० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत. तुम्ही फक्त धीर धरा. जर कोणी तुमची दिशाभूल करत असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आमचे सरकार यावर गांभीर्याने काम करत आहे", असं तेजस्वी यादव म्हणाले.