जर तुम्हीसुद्धा तुमच्या बाइकच्या सायलेन्सरमधून फटाके किंवा गोळीसारखा आवाज काढत असाल तर वेळीच सावध व्हा. अन्यथा तुमचा खिसा रिकामी होऊ शकतो. हरियाणामधील सोनीपत येथे ट्रॅफिक पोलिसांनी फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या एका बुलेटवर ३३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याशिवाय पोलिसांनी सुमारे डझनभर दुचाकीस्वारांवर विना हेल्मेट आणि कागदपत्रांसाठी दंडात्मक कारवाई केली आहे.
गोहाना ट्रॅफिक पोलिसांचे इन्चार्ज ईश्वर सिंह यांनी सांगितले की, गोहाना येथील आंबेडकर चौकाजवळ एक तरुण कर्कश आवाजात बुलेटवरून फटाके वाजवत जात होता. त्याला पकडून त्याच्याकडे कागद मागितले असता तो कुठलेही कागद दाखवू शकला नाही. या बाइकवर प्रेशर हॉर्नसह फटाक्यांसारखा आवाज काढणारा सायलेन्सर लावलेला होता. बाइकच्या मागे नंबरप्लेटही नव्हती. त्यामुळे या बुलेट चालकाला तब्बल ३३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
ट्रॅफिक पोलीस इन्चार्ज ईश्वर सिंह यांनी सांगितले की, अनेक दुचाकी चालक हेल्मेट घालत नाहीत, तिघे तिघे दुचाकीवरून प्रवास करतात. त्यामुळे रस्ते अपघाताची शक्यता असते. अनेक बुलेट चालक बुलेटमधून फटाक्यासारखा आवाज काढतात. त्यामुळे अशा वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे.