बदलीचा आदेश मला त्रास देण्यासाठी आला; न्यायमूर्ती प्रीतिंकर दिवाकर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 04:55 AM2023-11-23T04:55:08+5:302023-11-23T04:56:05+5:30
न्यायमूर्ती प्रीतिंकर दिवाकर यांचा मोठा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने छत्तीसगडउच्च न्यायालयातून आपली अलाहाबाद उच्च न्यायालयात केलेली बदली चुकीच्या हेतूने करण्यात आली होती, असा धक्कादायक दावा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मावळते मुख्य न्यायमूर्ती प्रीतिंकर दिवाकर यांनी केला आहे.
आपल्या निरोप समारंभात बोलताना न्यायमूर्ती दिवाकर यांनी माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केल्याचा आरोप केला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान कॉलेजियमने या वर्षाच्या सुरुवातीला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी दिवाकर यांच्या नावाची शिफारस केली होती. १९८४ मध्ये न्यायमूर्ती दिवाकर यांची मध्य प्रदेशच्या बार कौन्सिलचे सदस्य म्हणून नावनोंदणी झाली. जानेवारी, २००५ मध्ये छत्तीसगड उच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते.
नेमके काय म्हणाले?
माझ्या बदलीचा आदेश मला त्रास देण्याच्या वाईट हेतूने जारी करण्यात आला होता असे दिसते, परंतु सुदैवाने मला माझ्या साथीदार न्यायाधीश आणि बारच्या सदस्यांकडून प्रचंड पाठिंबा मिळाला, आपल्यावर झालेला अन्याय दुरुस्त केल्याबद्दल मी वर्तमान सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे आभार मानतो,’ असेही ते म्हणाले.
असा झाला प्रवास...
छत्तीसगड उच्च न्यायालयात साडेआठ वर्षांच्या कार्यकाळानंतर ३ ऑक्टोबर, २०१८ रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली झाली. त्यानंतर, या वर्षी १३ फेब्रुवारी रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, २६ मार्च रोजी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले.