नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असून, त्यानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेला शनिवारपासून अत्यंत जल्लोषात प्रारंभ झाला. स्वातंत्र्यदिनी, सोमवारपर्यंत ही मोहीम चालणार आहे. देशभरातील शहरे, गावांमध्ये सर्वत्र घराघरांवर तिरंगा ध्वज डौलाने फडकताना दिसत आहे. या मोहिमेचे समाजातील सर्व स्तरांतून स्वागत झाले आहे.
तिरंगा ध्वज घेऊन अनेक ठिकाणी शनिवारी मिरवणुका काढण्यात आल्या. श्रीमंतांच्या हवेलीपासून ते गरिबाच्या झोपडीवर तिरंगा ध्वज फडकत असल्याचे दृश्य भारावून टाकणारे होते. शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा मिरवणुकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. सामान्य नागरिकही यात मोठ्या संख्येने सहभागी झाले.
स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या पहिल्या दिवशी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे भेट देऊन स्वातंत्र्यसेनानी चित्तू पांडे यांना आदरांजली वाहिली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे ‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी मेरठ येथे तिरंगा ध्वज फडकवला. विविध राज्यांमध्ये तेथील मंत्री, सरकारी अधिकारी, सामान्य नागरिक ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत आयोजिलेल्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. त्यात महिला, लहान मुलांची लक्षणीय संख्या होती. विविध सामाजिक संस्था तसेच मंडळांचे कार्यकर्तेही यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून आले.
देशात चैतन्यमय वातावरण‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत विविध राज्यांमध्ये तिरंगा हाती घेऊन शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मिरवणुका काढल्या. विविध पक्षांचे राजकीय नेते, मंत्री, सरकारी अधिकारी, सर्वसामान्य जनांच्या घरांवर तिरंगा डौलाने फडकत आहे. ठिकठिकाणच्या बाजारांमध्ये नागरिक तिरंगी कपडे खरेदी करताना दिसत आहेत. मोठ्या रहिवासी सोसायट्यांनीही तिरंगी रोषणाई करून या उत्साहात भर घातली आहे. अनेक विक्रेत्यांनही तीन रंगांची मिठाई तयार करण्यावर भर दिला आले. विविध चॅनेल्सवरही देशभक्तीपर गीते आणि सिनेमे दाखविले जात आहेत. एकूणच ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे साऱ्या देशात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.
आरएसएसच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर फडकला तिरंगाराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) स्वातंत्र्य दिनापूर्वी शुक्रवारी सर्व सोशल मीडिया खात्यांवरील प्रोफाइल पिक्चर बदलले. या खात्यांवरील भगवा ध्वज हटवून तिरंगा ध्वज लावला आहे. आरएसएसने पहिल्यांदाच असा बदल केल्याने हा चर्चेचा विषय ठरला. ‘हर घर तिरंगा’ मोहीम घोषित केल्यानंतर विरोधी पक्षांनी आरएसएसवर हल्ला केला होता. सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी सोशल मीडिया खात्याच्या डीपीवर तिरंगा लावला आहे.
चंडीगडमध्ये विक्रमी मानवी तिरंगाचंडीगड : चंडीगड विद्यापीठाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाच्या आकारातील जगातील सर्वात मोठी मानवी साखळी तयार करुन शनिवारी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. तब्बल ५,८८५ विद्यार्थी, एनआयडी फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि अन्य मान्यवर व्यक्ती चंडीगड क्रिकेट स्टेडियममध्ये झेंड्याची मानवी साखळी तयार करण्यासाठी जमले. यूएईत २०१७ मध्ये ४,१३० लोकांच्या मदतीने ध्वजाची मानवी साखळी करण्यात आली होती. यावेळी चंडीगडचे प्रशासक आणि पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि चंडीगड विद्यापीठाचे कुलगुरू सतनाम सिंह संधू आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. देशभरातील लोकांनी तिरंगा ध्वजासोबतची आपली छायाचित्रे harghartiranga.com या वेबसाइटवर शेअर करावीत. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
तिरंगा हा साऱ्या भारताचा अभिमान आहे. स्वातंत्र्यलढ्यामध्ये असंख्य देशभक्तांनी बलिदान दिले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे आपला देश स्वतंत्र झाला. ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेद्वारे या स्वातंत्र्यसैनिकांना सर्व भारतीयांनी आदरांजली अर्पण केली आहे.- अमित शहा, गृहमंत्री