नवी दिल्ली : १.६४ लाख कोटी रुपयांचे भरघोस पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केल्यानंतर सरकारने बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. ‘चलता है’ हा सरकारी खाक्या सोडा आणि उच्च दर्जाच्या व्यावसायिकतेने काम करा. ज्यांना जमणार नाही, त्यांना सक्तीने निवृत्त करून घरी पाठवले जाईल, अशी तंबी दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
बीएसएनएलसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १.६४ लाख कोटींचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. ६२ हजार मजबूत कर्मचारी वर्ग असलेल्या बीएसएनलच्या वरिष्ठ व्यवस्थापनाची एक महत्त्वाची बैठक वैष्णव यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी म्हटले की, ‘कामगिरी दाखवा अथवा नष्ट व्हा’ हे आता ‘न्यू नाॅर्मल‘ असेल. जे कर्मचारी काम करणार नाहीत, त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी जावे.
‘एमटीएनएल’बाबत आशा सोडली
दूरसंचार क्षेत्रात एमटीएनएल आणि बीएसएनएल या २ सरकारी कंपन्या कार्यरत आहेत. दोन्ही कंपन्या डबघाईला आल्या आहेत. एमटीएनएलबाबत तर आशाच सरकारने साेडली आहे. वैष्णव यांनी म्हटले की, ‘एमटीएनएलला कोणतेही भवितव्य नाही. त्यांच्यासाठी आम्ही फार काही करू शकत नाही. एमटीएनएलचे पुढे काय करायचे, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल.’