अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चार दिवसांसाठी भारताच्या दौऱ्यावर येणार होते. यासाठी ते गुरुवारी, ७ सप्टेंबरला दिल्लीत येणार होते. परंतू, ते काल आलेच नाहीत. आता आज सायंकाळी ते जी २० परिषदेसाठी दिल्लीत पोहोचणार आहेत. व्हाईट हाऊसने याबाबत नव्याने माहिती कळविली आहे. बायडेन आज सायंकाळी सात वाजता दिल्लीत येतील आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. यावेळी द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
बायडेन ठरलेल्या दिवशी भारतात न आल्याने त्यांचा चार दिवसांचा दौरा आता तीन दिवसांचा होणार आहे. मोदी यांच्याशी चर्चेनंतर बायडेन ९ आणि १० सप्टेंबरला होणाऱ्या जी-२० मध्ये भाग घेतील. जगातील वेगवेगळ्या समस्यांवर मोदी-बायडेन बैठकीत विस्तृत चर्चा केली जाईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. बायडेन हे ठरल्याप्रमाणे गुरुवारी का आले नाहीत, याचे कारण अमेरिकेने दिलेले नाहीय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या स्वागतासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. अतिथी देवो भवाच्या धर्तीवर विमानतळ ते हॉटेलपर्यंत त्यांचे स्वागत करण्याची व्यवस्था आहे. दिल्लीतील ITC मौर्या शेरेटन हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. यापूर्वी हॉटेलमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर, बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश, बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प हे देखील राहून गेले होते.
दिल्लीतील ITC मौर्या शेरेटन हॉटेलच्या प्रत्येक मजल्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या गुप्तहेर संस्थेचे कमांडो तैनात केले जाणार आहेत. हॉटेलच्या 14व्या मजल्यावर असलेल्या 'चाणक्य' या दोन बेडरूमच्या ग्रँड प्रेसिडेंशियल स्वीटमध्ये बायडेन थांबणार आहेत. यासाठी विशेष लिफ्ट बसविण्यात आली आहे. सीक्रेट सर्व्हिसेसच्या तीनशे अमेरिकन कमांडो बायडेन यांच्यासाठी अमेरिका तैनात करणार आहे.