भोपाळ - तुम्ही मंत्री किंवा कुठल्यातरी सेलेब्रिटीच्या सुरक्षेसाठी तैनात केलेली चोख सुरक्षाव्यवस्था पाहिली असेल. मात्र तुम्ही कधी कुठल्याही झाडाला व्हीव्हीआयपी सुरक्षा मिळाल्याचं पाहिलंय का. मध्य प्रदेशमधील रायसेन येथे एक असं झाड आहे ज्याच्याभोवती २४ तास पहारा असतो. हे झाड एवढं खास आहे की, जर त्याचं एखादं पान जरी तुटलं तरी अधिकाऱ्यांचं टेन्शन वाढतं. अजून उल्लेखनीय बाब म्हणजे या झाडाची माणसांप्रमाणे वैद्यकीय चाचणी होते. माहितगार सांगतात की, सांचीमध्ये या बोधीवृक्षाला २०१२ मध्ये श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी लावले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही त्यावेळी उपस्थित होते.
या व्हीव्हीआयपी झाडाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक कायम तैनात असतात. तसेच या झाडाची दर १५ दिवसांनी वैद्यकीय तपासणी केली जाते. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या झाडाबाबत अनेक धार्मिक आख्यायिका आहेत. एवढंच नाही तर बौद्ध धर्मामध्ये या झाडाचं खास असं महत्त्व आहे. याड बोधीवृक्षाखाली भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. तसेच सम्राट अशोकाला शांतीच्या शोधात जाण्याची प्रेरणाही याच वृक्षामधून मिळाली होती.
या खास अशा बोधिवृक्षाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा चहुबाजूंनी १५ फूट उंच जाळी लावण्यात आली आहे. तसेच दिवसरात्र पहाऱ्यासाठी दोन गार्डही तैनात केलेले आहेत. हे झाड एवढं खास आहे की, त्याचं एखादं पान जरी तुटलं तरी अधिकारी तपासणीसाठी येतात. सांची नगर परिषद, पोली, महसूल विभाग आणि उद्यानिकी विभाग असे सर्व विभाग मिळून या झाडाच्या देखभालीची काळजी घेतात.
मिळालेल्या माहितीनुसार या झाडाच्या सुरक्षेसाठी दरवर्षी सुमारे १५ लाख रुपये खर्च होतो. दर १५ दिवसांनी या झाडाला खत दिले जाते. दररोज पाणी दिले जाते. असा हा ऐतिहासिक बोधीवृक्ष रायसेन जिल्ह्यातील सांची बौद्ध युनिव्हर्सिटीच्या पर्वतावर आहे. सर्वसाधारणपणे पाहिले तर हा सधारण पिंपळाच्या झाडासारखा आहे. मात्र याच्याभोवती असलेली सुरक्षा आणि देखभालीमुळे त्याला व्हीव्हीआयपी वृक्ष म्हणतात.