गेल्या काही काळात विवाह ठरवताना फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशमधील मेरठ येखील ब्रह्मपुरी परिसरामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाचं त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या आईशीच लग्न लावून देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देताना मोहम्मद अझीम या २२ वर्षीय तरुणाने सांगितले की, माझं लग्न शामली जिल्ह्यातील २१ वर्षांच्या मंताशा नावाच्या तरुणीशी निश्चित करण्यात आलं होतं. हे लग्न माझा मोठा भाऊ नदीम आणि वहिनी शाइदा यांनी ठरवलं होतं. ठरल्याप्रमाणे ३१ मार्च रोजी लग्न झालं. मात्र लग्नाचे रीतीरिवाज पूर्ण करत असताना मौलवींनी वधूचं नाव मंतशा ऐवजी ताहिरा असं लिहिलं. त्यामुळे मला संशय आला. निकाह झाल्यानंतर जेव्हा मी वधूच्या डोक्यावरील पदर उचलला तेव्हा आतमध्ये मंतशा नव्हे तर तिची ४५ वर्षीय विधवा आई ताहिरा होती, असे अझीम यांने सांगितले
या प्रकरणी अझीमने आरोप करताना सांगितले की, या लग्नासाठी ५ लाख रुपयांची देवाण घेवाण झाली होती. जेव्हा मी या फसवणुकीला विरोध केला, तेव्हा माझा भाऊ आणि वहिनीने मला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात फसवण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर अझीम याने पोलिसांकडे धाव घेतली. तसेच या प्रकरणी तक्रार दिली.
दरम्यान. प्रकरणाचा तपास ब्रह्मपुरीच्या सीओ सौम्या अस्थाना करत होत्या. त्यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली आहे. तसेच अझीम याने आपली तक्रार मागे घेतली आहे. मला हे प्रकरण अजून वाढवायचं नाही आहे, असे अझीमने सांगितले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र आता या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत असून, लोक झाल्या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत.