भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीच्या प्रयोगांनंतर डगमगणाऱ्या जगाला आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग भारत दाखवेल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी थायलंडच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विश्व हिंदू काँग्रेसच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी जगभरातील हिंदूंना एकमेकांशी जोडले जाण्यासंदर्भात आवाहनही केले.
यावेळी भागवत, 'जगभरातील विचारवंत, कार्यकर्ते, नेते आणि उद्योजकांना संबोधित करताना म्हणाले, 'आपल्याला प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचावे लागेल, त्यांच्यासोबत संपर्क साधावा लागेल. सर्व हिंदू एकत्र येऊन जगभरातील हिंदूंसोबत संपर्क साधतील. हिंदू अधिकाधिक संख्येने एकमेकांसोबत जोडले जात आहेत आणि जगाशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.'
भागवत म्हणाले, भारत आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग दाखवेल, हे कोरोना महामारीनंतर संपूर्ण जगाने मान्य केले आहे आणि सर्वसम्मतीने यावर विचारही करत आहे. ते म्हणाले, सध्या संपूर्ण जग भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीचे प्रयोगा करताना डगमगत आहे आणि आनंदाच्या शोधात हिंदुत्वाकडे बघत आहे.
सरसंघचालक म्हणाले, 'आजचे जग डगमगत आहे, चाचपडत आहे. गेली 2,000 वर्षे त्यांनी आनंद आणि शांतेसाठी भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीचे प्रयोग केले. त्यांनी अनेक धर्मांशी संबंधित प्रयोगही केले. त्यांना भौतिक समृद्धी मिळाली. मात्र, समाधान मिळाले नाही. आता कोरोना महामारीनंतर, त्यांनी यावर पुनर्विचार करायला सुरुवात केली आहे. आता, भारतच मार्ग दाकवेल, यावर त्यांचे एकमत झाल्यासारखे वाटत आहे.
'आपल्याला सर्वांशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना आपल्या सेवांच्या माध्यमाने आमच्याकडे आणावे लागेल. आपल्याकडे उत्साह आहे. निःस्वार्थ सेवेसाठी आपण जगात अग्रेसर आहोत. हे आपल्या परंपरा आणि मूल्यांमध्ये आहे. यामुळे लोकांपर्यंत पोहोचा आणि त्यांची मने जिंका,' असेही भागवत म्हणाले.