रायपूर - छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या एका ब्रिज कंस्ट्रक्शन साइटवरू गेल्या शुक्रवारी नक्षलवाद्यांनी इंजिनिअर अशोक पवार आणि आनंद यादव या मजुराचे अपहरण (Engineer Ashok Pawar and worker Anand Yadav) केले होते. यानंतर मंगळवारी रात्री पत्नीच्या विनंतीवरून नक्षलवाद्यांनी इंजिनिअरला सोडून दिले. या इंजिनिअरची पत्नी आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह जंगलात नक्षलवाद्यांना भेटण्यासाठी गेली होती. ती आपल्या पतीच्या सुटकेची मागणी करत होती.
याच बरोबर, पत्नीने एक व्हिडिओही जारी केला होता. यात, अशोकच्या सुटकेनंतर आम्ही सर्वजण आपल्या गावी मध्य प्रदेशात निघून जाऊ, असे म्हणण्यात आले होते. बस्तर रेंजचे आयजी पी. सुंदरराज यांनी सांगितले की, दोघेही मंगळवारी रात्री बेद्रे कॅम्पमध्ये पोहोचले. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्यास आमचे प्राधान्य आहे. पुढील माहिती नंतर शेअर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
आयजी म्हणाले, दोघांची सुटका कशी झाली, यासंदर्भात अद्याप माहिती नाही. यावेळी इंजिनिअर अशोकच्या सुटकेची बातमी कळताच सोनाली आणि तिची मुले आनंदी झाले आहेत. अपहरणाचे वृत्त समजताच त्यांच्या मध्यप्रदेशातील घराचीही चिंता वाढली होती. खरे तर, नक्षलवाद्यांनी पाच दिवसांपूर्वीच इंजिनिअर आणि मजुराचे अपहरण केले होते. यादरम्यान दोघांचीही काहीही माहिती मिळू शकलेली नाही. पीडित दोघेही एमपीचे रहिवासी आहेत.
अपहरणानंतर माओवाद्यांनी पूर्णपणे मौन बाळगले आहे. त्यांना कसल्याही प्रकारची मागणीही केलेली नव्हती. संबंधित दोघांनाही सीमेपलीकडे महाराष्ट्रात नेले गेले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात होता. सोनाली पवार आणि तिच्या दोन मुलींनी गेल्या शनिवारी एक व्हिडीओ जारी करत माओवाद्यांना संबंधितांना सोडण्याचे आवाहन केले होते.
सोनाली यांनी सोमवारी माओवाद्यांना भेटण्याचा आणि अशोक यांना सोडविण्यासाठी राजी करण्यास्तव जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या काही नागरिकांशी बोलल्या आणि एकदा आपल्या पतीची सुटका झाल्यानंतर आपण मध्यप्रदेशात आपल्या मूळ गावी नुघून जाऊ असेही तिने सांगितले. आपला पती निर्दोष आहे, काही गैरसमज निर्माण झाला असल्यास त्यांना क्षमा करावी, असेही सोनाली यांनी म्हटले होते.