महिलेचा पुरुष झाला अन् आता बहिणीच्या मैत्रिणीशी बांधली लग्नगाठ; देशातील पहिली घटना!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 01:35 PM2023-12-08T13:35:34+5:302023-12-08T14:24:42+5:30
अलका हिने तिच्या ४७ व्या जन्मदिनी लिंगबदलासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. यशस्वी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ती महिलेची पुरुष झाली.
इंदूर : इंदूरमधील अलका ही तरुणी मागील वर्षी लिंगबदलाची शस्त्रक्रिया करत पुरुष झाली आणि अस्तित्व हे नाव धारण केले. महिलेचा पुरुष झालेल्या अस्तित्वने एका तरुणीशी लग्नगाठ बांधली आहे. अशा प्रकारच्या विवाहाची देशातील ही पहिलीच घटना आहे. अस्तित्वने स्पेशल मॅरेज अॅक्टच्या अंतर्गत हा विवाह केला आहे. विशेष म्हणजे अस्तित्व आपल्या बहिणीच्या मैत्रिणीलाच आयुष्याची जोडीदार म्हणून निवडलं आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अलकाने आपल्या ४७ व्या जन्मदिनी लिंगबदलासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ती महिलेची पुरुष झाली. तसंच तिने आपलं नाव बदलून अस्तित्व असं केलं. अस्तिव ज्या तरुणीशी विवाहबंधनात अडकला आहे ती त्याच्या बहिणीची मैत्रीण असून आस्था असं तिचं नाव आहे.
आस्थाला दिली होती संपूर्ण प्रक्रियेची माहिती
अलकाचा अस्तित्व होण्याची जी प्रक्रिया सुरू होती, त्या संपूर्ण प्रक्रियेबाबत आस्था या तरुणीला माहिती देण्यात आली होती. मी फार विचार करून अस्तित्वशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, असं आस्था या तरुणीने म्हटलं आहे. तसंच या दोघांच्या कुटुंबियांचीही या विवाहाला मान्यता होती. त्यामुळे आस्था आणि अस्तित्वने विवाहाच्या परवानगीसाठी अप्पर जिल्हाधिकारी रोशन राय यांच्याकडे अर्ज केला होता. या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी लग्नावेळी २५ नातेवाईक हजर होते.
काय आहे स्पेशल मॅरेज अॅक्ट?
स्पेशल मॅरेज अॅक्ट हा भारतातील सर्व धर्मांसाठी लागू होतो. या कायद्यांतर्गत लग्न करण्यासाठी तुम्हाला धर्मात बदल करण्याची आवश्यकता नसते. भारतातील कोणताही नागरिक ज्या जातीत किंवा धर्मांत आहे तिथं तो लग्न करू शकतो, असा अधिकार या कायद्यान्वये प्राप्त होतो.