लग्नानंतर १३ वर्षे वाट पाहिली; महिलेनं आता एकाचवेळी दिला ३ मुलांना जन्म, कुटुंब आनंदित!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:29 PM2024-02-28T18:29:45+5:302024-02-28T18:46:46+5:30
बालकांचं वजन सामान्य बालकांपेक्षा कमी असल्याने त्यांना एसएनसीयू वॉर्डात ठेवण्यात आलं आहे.
लग्नानंतर १३ वर्षांनी महिला गरोदर राहिली आणि तिने एकाचवेळी तीन मुलांना जन्म दिला. ही घटना मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यात घडली आहे. प्रसूतीनंतर महिलेसह तिन्ही नवजात बालकांना जिल्हा रुग्णालयातील सीएनसी वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मंगळवारी जिल्हा रुग्णालयात पिछोर तालुक्यातील पडोरा गावात राहणाऱ्या रीना सिंह या २८ वर्षीय महिलेला प्रसूती वेदना होत असल्याने दाखल करण्यात आलं. त्यानंतर रीना यांनी एक-एक मिनिटाच्या अंतराने तीन बालकांना जन्म दिला. यामध्ये एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या बालकांचं वजन सामान्य बालकांपेक्षा कमी असल्याने त्यांना एसएनसीयू वॉर्डात ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, "आमच्या लग्नाला १३ वर्षे झाली. मात्र आम्हाला मूल होत नव्हतं. यासाठी आम्ही अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले. आता १३ वर्षांनंतर अखेर घरात चिमुकल्यांची किलबिल होणार असल्याने आम्ही खूश आहोत," अशी प्रतिक्रिया महिलेच्या पतीने दिली आहे.