नवी दिल्ली ।
दिवसेंदिवस जगभरातील वाघांची संख्या कमी होत चालली आहे. त्यात आणखी एक भर पडली आहे. कारण भारत आणि जगातील सर्वात वयस्कर (Oldest Tiger of world Dies) असलेल्या 'राजा' वाघाचामृत्यू झाला आहे. एसकेबी रेस्क्यू सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाने वयाच्या २६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राजा वाघाला पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वारा येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रामध्ये ठेवण्यात आलं होतं. लक्षणीय बाब म्हणजे राजा हा देशातील सर्वाधिक काळ जगणाऱ्या वाघांपैकी एक होता.
रॉयल बंगाल टायगर 'राजा'चे वय २६ वर्षे १० महिने आणि १८ दिवस इतकं होतं. तसेच राजा २३ ऑगस्ट रोजी आपला २७ वा वाढदिवस साजरा करणार होता. मात्र तो २७ व्या वाढदिवसाला मुकला आणि ४० दिवस आधीच जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे त्याच्या वाढदिवसाची तयारी देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली होती.
२६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासएसकेबी रेस्क्यू सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, काल म्हणजेच सोमवारी पहाटे ३ वाजता राजा वाघाचा मृत्यू झाला. वृद्धापकाळामुळे राजा मागील काही दिवसांपासून अन्न ग्रहण करत नव्हता अशी माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली. राजाच्या मृत्यूच्या बातमीने प्राणीप्रेंमीमध्ये शोककळा पसरली आहे. अलीपूरद्वारचे जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्र कुमार मीना आणि वन संचालनालयाचे अधिकारी दीपक एम यांच्यासह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रॉयल बंगाल टायगर राजाला श्रद्धांजली वाहिली.
मगरीच्या हल्ल्यात झाला होता जखमी २००६ मध्ये 'राजा'ला सुंदरबनमधून जखमी अवस्थेत पकडण्यात आलं होतं. त्यामुळे त्याला पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. वनविभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदरबनमधील माताळा नदी ओलांडत असताना 'राजा'वर मगरीने हल्ला केला होता ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. तसेच 'राजा' वाघ मागील काही दिवसांपासून आजारी होता. त्याने काही दिवसांपूर्वी खाणेपिणेही सोडले होते. राजा याचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप समोर आला नाही अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्र कुमार यांनी दिली.