Priyanka Gandhi on BJP RSS : राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल मांडलेल्या भूमिकेनंतर भाजप आणि एनडीएतील मित्रपक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच भाजपच्या काही नेत्यांसह मित्रपक्षातील नेत्यांनीही राहुल गांधींबद्दल विधाने केली आणि हा वाद वाढला. भाजप आणि एनडीएतील नेत्यांकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधींबद्दल केल्या जात असलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल आता प्रियंका गांधींनी संताप व्यक्त केला आहे.
प्रियंका गांधी यांनी एक पोस्ट करून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप आणि आरएसएसवर टीकास्त्र डागले आहे.
प्रियंका गांधी काय म्हणाल्या?
प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की, "विरोधी पक्षनेते राहुल गांधी जसे जसे ताकदीने जनतेसाठी बोलत आहेत, तसे तसे त्यांच्याविरोधात बोलण्यातून आणि वैचारिक हिंसा वाढत आहे."
"देशातील कोट्यवधि दलित, मागास, आदिवासी आणि गरिबांसाठी आवाज उठवणे इतका मोठा गुन्हा आहे का की, भाजपा विरोधी पक्षनेत्याला त्यांच्या आजीसारखे हाल करण्याची धमकी देत आहे?", असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे.
मोदी-शाहांवर केला गंभीर आरोप
राहुल गांधी विरोधात बोलण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री, भाजपा आणि आएसएसचे भडकावत आहे, असा आरोप प्रियंका गांधींनी केला आहे.
"एकापाठोपाठ एक हिंसक, अशोभनीय, अमानवीय विधानांमधून हे सिद्ध होते की, ही एक संघटित आणि सुनियोजित मोहीम आहे, जी देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक आहे.त्यापेक्षाही भयंकर म्हणजे पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह भाजपा, आरएसएस नेतृत्वाकडून याला भडकावून दिले जाणे आणि कारवाई न करणे", असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
"आरएसएस आणि भाजपाच्या लोकांना हिंसा आणि द्वेषालाच लोकशाहीचा मूलमंत्र बनवायचा आहे का?", असा सवाल प्रियंका गाधी यांनी केला आहे.
मल्लिकार्जून खरगेंचे मोदींना पत्र
राहुल गांधींवर टीका करताना भाजप आणि एनडीएतील पक्षाच्या काही नेत्यांकडून वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मोदींना पत्र लिहिले आहे.
राहुल गांधींबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानामध्ये खरगे यांनी संजय गायकवाड यांच्याकडून करण्यात आलेल्या विधानाचाही उल्लेख केलेला आहे. राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देईन, असे आमदार संजय गायकवाड म्हणाले होते.
गायकवाड यांच्या विधानानंतर भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनीही राहुल गांधींच्या जीभेला चटके दिले पाहिजे, असे विधान केले आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे.