नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे कुस्तीपटूंचे धरणे आंदोलन रविवारी पंधराव्या दिवशीही सुरू होते. कुस्तीपटूंना पाठिंबा म्हणून रविवारी जंतरमंतरवर खाप महापंचायतीचे सदस्य धडकले असून, एका प्रदीर्घ संघर्षाच्या तयारीनेच ते आले आहेत.
रविवारी सकाळी टिकरी हद्दीत शेतकरी नेत्यांसोबत आलेल्या महिलांनी बॅरिकेट्स हटवले. पोलिसांनीही त्यांना रोखले नाही. शेतकऱ्यांनी छोट्या वाहनांनी जंतरमंतर गाठले. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आम्ही शांततेत महापंचायत करत आहोत, पोलिसांनी शेतकऱ्यांना पोलिस ठाण्यात नेल्यास तेथेच महापंचायत होईल, असा इशारा दिला आहे.
उत्पादक-विक्रेत्यांनाच फुटला घाम, ग्राहकांनी फिरविली पाठ
मेहम चौबिसी सर्वखाप पंचायतीने हरयाणाच्या खाप पंचायतींची बैठक बोलावली होती. यात ६५ खाप सदस्य सहभागी झाले. यात जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. नियोजनासाठी ३१ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
खाप पंचायत ही गावांची एक सामुदायिक संस्था आहे, जी विशिष्ट जाती किंवा गोत्रांनी बनलेली असते. त्यांना कायदेशीर आधार नाही. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना बेकायदा ठरवले आहे. असे असूनही खाप पंचायती त्यांच्या समाजातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
समाजाने बनवलेल्या नियमांच्या पलीकडे जाणाऱ्यांना खाप पंचायती शिक्षा करतात. त्यांना दिलेली सर्वात मोठी शिक्षा ही सामाजिक बहिष्कार मानली जाते. याशिवाय आर्थिक दंडही ठोठावतात.
खाप पंचायतीचा प्रभाव हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये अधिक दिसून येतो. महापंचायत ही सर्व खापांची पंचायत म्हणूनही ओळखली जाते. सामूहिक मुद्दा असतो, तेव्हा अनेक खाप एकत्र येऊन महापंचायत बोलावली जाते.