अलाहाबाद : ‘पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाखाली विरुद्ध लिंगाच्या सदस्याशी मुक्त संबंधांच्या आमिषाने देशातील तरुण आपले आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. तथापि, त्यांना खरा सोबती सापडत नाही. सोशल मीडिया, चित्रपट, टीव्ही मालिका आणि दाखवल्या जाणाऱ्या वेबसिरीजच्या प्रभावाखाली देशातील तरुणांना त्यांच्या जीवनातील चांगल्या मार्गाचा शोध घेता येत नाही आणि योग्य सोबती ठरवता येत नाही. बहुदा हे तरुण चुकीच्या व्यक्तींच्या गराड्यात सापडतात, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी नोंदवले.
सोशल मीडिया, चित्रपटांत अनेक जोडीदारांशी संबंध आणि विश्वासघात सामान्य झाला आहे. त्याच्या प्रभावाखाली तरुणही तसे प्रयोग करू लागतात, परंतु ते प्रचलित सामाजिक रूढीमध्ये बसत नाहीत,” असे निरीक्षण न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी नोंदवले.
तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपीच्या जामीन याचिकेवर कोर्ट सुनावणी करत होते. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. त्याचे त्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. कोर्ट म्हणाले की, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा करण्यासारखे या प्रकरणात काही नाही, पीडितेचे अनेक मुलांसोबत प्रेमसंबंध होते. नंतर तिच्या नातेवाइकांचा दबाव किंवा तरुणांशी न पटल्याने निराश होऊन तिने डास मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केली.
परिणामांची जाणीव नाही...
खंडपीठाने म्हटले की, पाश्चात्त्य संस्कृतीच्या पालनामुळे परिणामांची जाणीव नसलेली तरुण पिढी मुक्त नात्यांमध्ये प्रवेश करत आहेत.
त्यानंतर जोडीदाराच्या निवडीला सामाजिक मान्यता मिळाल्यानंतर त्यांचा भ्रमनिरास होतो. अशा नातेसंबंधात प्रवेश केल्यावर त्यांना त्या संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सापडत नाही.
भारतीय कुटुंबांत संभ्रम
भारतीय पालक त्यांच्या मुलांना पाश्चात्त्य रूढी स्वीकारण्याची परवानगी द्यायची की त्यांना भारतीय संस्कृती बांधून ठेवायचे याबद्दल संभ्रमावस्थेत आहे. यामुळे काही वेळा त्यांची मुले स्वतःच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी घरातून फरार होतात. घाईघाईत निर्णय घेतल्यामुळे किंवा कधी कधी त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.