बिहारची राजधानी पाटणा येथून अपहरणाची एक अजब घटना समोर आली आहे. पाटणामध्ये ज्या तरुणीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ती प्रत्यक्षात तिच्या प्रियकराजवळ पंजाबमध्ये सापडली. पाटणामधील मेहंदीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे बारावीत शिकरणारी एक १८ वर्षांची तरुणी कॉलेजमध्ये जाण्याचा बहाणा करून पंजाबमध्ये पळाली. तिथे ती तिचा प्रियकर गुरू प्रताप सिंह याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. मिळालेल्या माहितीनुसार ती ३१ जुलै रोजी पाटणा जंक्शन येथे पोहोचली. त्यानंतर चेहरा लपवून दिलदारनगर येथे गेली. तिथून तिने लुधियानाकडे जाणारी ट्रेन पकडली. लुधियाना येथे ती प्रियकरासोबत एका हॉटेलमध्ये राहिली.
यादरम्यान, पाटणा येथे कुटुंबीयांनी जेव्हा तिचा शोध सुरू केला. तेव्हा तिचा मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. जेव्हा फोन सुरू झाला तेव्हा पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला. तेव्हा माझं अपहरण झालं असून, अपहरणकर्त्यांनी मला ५-६ मुलींसोबत कोंडून ठेवलं आहे. ते लोक माझी किडनी विकतील, असं सांगून तिनं रडण्याचंनाटक केली. मात्र तिने आपण कुठे आहोत हे कुटुंबीयांना सांगितले नव्हते. या तरुणीचा ऑडिओ भेटल्यानंतर पाटणा पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली.
पाटणा पोलिसांनी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटचा जेव्हा तपास केला तेव्हा त्यांना काही पुरावे सापडले. तर जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा बरीच माहिती सापडली. ही तरुणी गुरू प्रताप सिंह याच्यासोबत पंजाबमध्ये असल्याचे समोर आले. पाटणा पोलिसांचं पथक जेव्हा पंजाबमध्ये पोहोचले तेव्हा सदर तरुणीने चंडीगड कोर्टामध्ये आई-वडिलांपासून आपल्याला धोका असल्याची तक्रार दिल्याचे समोर आले. त्यानंतर ही तरुणी लुधियाना येथून संगरूर येथे गेली. पोलीस तिला घेऊन पंजाबमधील न्यायालयात पोहोचले. तिथे तिचा जबाब नोंदवण्यात आला. पाटणाचे शहर एसपी संदीप सिंह यांनी सांगितले की, या तरुणीने मुनक कोर्टामध्ये तिचं कुणीही अपहरण केलं नसून, ती स्वत:च्या मर्जीने गुरू प्रतापसोबत राहण्यासाठी आली असल्याचं सांगितलं.
पाटणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर तरुणी अद्यापही पंजाबमध्येच आहे. तसेच तिचं अपहरण झालेलं नाही. जो ऑडिओ व्हायरल झाला होता. तो खरा नव्हता. तिचा प्रियकर गुरू प्रताप हा किरकोळ नोकरी करतो. तो संगरूरमधील खनोरी गावामध्ये राहतो. पाटणाचे सिटी एसपी ईस्ट यांनी सांगितले की, या तरुणीने आपण स्वत:च्या इच्छेने आल्याचे सांगितले. तसेच तिची इन्स्टाग्रामवरून गुरू प्रताप याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांनीही लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तरुणीने सांगितलं की, मी कुणाच्याही दबावामुळे नाही तर स्वत:च्या मर्जीने गेले होते. माझ्या वडिलांनी जी तक्रार दाखल केली आहे. ती चुकीची आहे.