उत्तराखंडमधील हल्द्वानी इथं झालेल्या हिंसाचारात अनेक निरपराधी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये बिहार येथून नोकरीच्या शोधात आलेल्या एका तरुणाचाही समावेश आहे. तरुणाच्या मृत्यूची बातमी पोहोचताच त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. कुटुंबीयांनी तातडीने नैनीताल येथे धाव घेतली. तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा बनभूलपुरा रेल्वे स्टेशनच्या इथे रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळला. त्याच्या डोक्यात गोळी लागली होती.
याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, बिहारमधील छीनेगाव येथील श्यामदेव सिंह यांचा मुलगा प्रकाश कुमार (वय २४ वर्ष) हा नोकरीच्या शोधात उत्तराखंड इथं गेला होता. मात्र त्यादरम्यानच हल्द्वानी इतं बुलडोजर कारवाईनंतर हिंसा पसरली. यावेळी डोक्यात गोळी लागून प्रकाश कुमार याचा मृत्यू झाला.
प्रकाशवर आमच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी होती, असं त्याची बहीण दीप्ती सिंह हिने सांगितलं. तर त्याची आई म्हणाली की, "पाच मुलींच्या पाठीवर प्रकाशचा जन्म झाला होता. बीएचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीच्या शोधात होता. नोकरी शोधण्यासाठी उत्तराखंड इथं जाताना त्यांने सांगितलं होतं की तो सगळ्यांसाठी महागडे गिफ्ट घेऊन येईल. मात्र आता त्याच्या मृत्यूची बातमी आमच्यापर्यंत आली आहे," असं म्हणत प्रकाशच्या मृत्यूनंतर आईने प्रचंड आक्रोश केला.