नवी दिल्ली – सध्याच्या सोशल मीडिया जगतात व्हायरल होण्याची क्रेझ इतकी डोक्यात गेलीय की समाजात माणुसकी हरवत चाललीय हे खेदाने म्हणावे लागेल. कुठल्याही अपघाताची घटना असेल तर आधी व्हिडिओ काढू आणि सोशल मीडियावर लाईक्स, फॉलोअर्स वाढवण्याचा विचार माणसाच्या मनात येतो हे दिल्लीतील एका घटनेवरून दिसून आले. एका युवा चित्रपट निर्माता पीयूष पालसोबत हेच घडले. एका बाईकला धडकल्याने पीयूष यांचा रस्त्यात अपघात झाला. जवळपास अर्धा तास ते रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते परंतु मदत करण्यासाठी कुणाचाही हात पुढे आला नाही.
पीयूष पालच्या शरीरातून रक्त जात होते. त्यांना तात्काळ उपचारांची गरज होती. मात्र हद्द म्हणजे याठिकाणी उपस्थित लोकं उभं राहून पीयूष पाल तडफडत असताना व्हिडिओ काढण्यास गुंग राहिले. व्हिडिओ, फोटो काढणाऱ्यांपैकी कुणीही पीयूषला हॉस्पिटलला पोहचवले नाही. दुर्दैवाने उपचार न मिळाल्याने पीयूष पालचा मृत्यू झाला. पीयूष पालसोबत घडलेला प्रकार हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे.
मागील गुरुवारी दिल्लीच्या रिंग रोडवर रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी पीयूष पालचा रस्ते अपघात झाला. रस्त्यावर जखमी अवस्थेत पीयूष अर्धा तास विव्हळत राहिला. परंतु त्याला कुणीही हॉस्पिटलला पोहचवलं नाही. जखमी अवस्थेत रक्त जास्त सांडल्याने पीयूषचा जीव गेला. या घटनेचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. घटनास्थळी पीयूष पालला कुणी मदत केली नाही पण चोरांनी पीयूषचा फोन आणि लॅपटॉप चोरी करून पसार झाले.
अलीकडेच केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने देशातील अपघातांची आकडेवारी जारी केलीय. २०२२ मध्ये देशात १ लाख ६८ हजाराहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. देशात ७१ टक्के अपघात वेगवान वाहनांमुळे झाले आहेत. अतिवेगामुळे १ लाख २० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. नशेत ड्रायव्हिंग करण्यामुळे ४ हजार २०० लोकांना जीव गमवावा लागला आहे. मोबाईल फोनच्या वापरामुळे ३४०० लोकं दगावली आहेत. रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचा झाला आहे. अपघातातील मृतांपैकी ५० टक्के लोकांनी हेल्मेट घातले नव्हते. रस्ते अपघातात देशात राजधानी दिल्ली असुरक्षित मानली जाते. इथं २०२२ मध्ये १ हजार ४६१ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.