- अमृता कदमनवी दिल्ली: राजधानीत १७ फेब्रुवारीपासून सुरू होणा-या ‘थिएटर आॅलिंपिक्स’द्वारे भारतीय प्रेक्षकांना जागतिक नाटक पाहायला मिळणार आहे. भारत प्रथमच ‘थिएटर आॅलिंपिक्स’चे यजमानपद भूषवित आहे. हे आठवे थिएटर आॅलिंपिक्स असून ३० देशांतून येणारे २५ हजारांहून अधिक कलाकार, देशातील सतरा शहरांमध्ये होणारे नाटकांचे ४५० प्रयोग, ६०० अँबियन्स परफॉर्मन्सेस, २५० यूथ फोरम अशा कार्यक्रमांची पर्वणी रसिकांना यानिमित्ताने मिळणार आहे.‘फ्लॅग आॅफ फ्रेंडशिप’ अशी या ‘थिएटर आॅलिंपिक्स’ची संकल्पना आहे. केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक प्रो. वामन केंद्रे, राष्ट्रीय नाट्य विद्यालय सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अर्जुन देव चारण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली.जे विषय पुस्तके व व्याख्यानातून उलगडून दाखविता येत नाहीत, ते नाटकांतून दाखविता येतात. त्यामुळेच थिएटर आॅलिंपिक्सद्वारे रंगभूमीचा उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली असल्याची भावना डॉ. महेश शर्मा यांनी व्यक्त केली. भारताला हजारो वर्षांची समृद्ध नाट्यपरंपरा आहे. मात्र जागतिक व्यासपीठावर तिला नेण्यात आपण कोठेतरी कमी पडलो. थिएटर आॅलिंपिक्समुळे भारतीय नाट्यकलेच्या देदिप्यमान परंपरा जगासमोर येईल, असा विश्वास वामन केंद्रे यांनी व्यक्त केला.लाल किल्ल्याच्या प्रांगणात १७ फेब्रुवारीला संध्याकाळी साडे पाच वाजता थिएटर आॅलिंपिक्सला सुरुवात होईल तर ८ एप्रिल रोजी मुंबईमध्ये गेट वे आॅफ इंडियाच्या साक्षीने या महोत्सवाची सांगता होईल. ग्रीसमधील डेल्फीमध्ये१९९३ साली पहिल्यांदा थिएटर आॅलिंपिक्सचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातीलनाटककारांना वैचारिक-सांस्कृतिक आदानप्रदानासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा उद्देश यामागे आहे. जपान, रशिया, तुर्कस्तान, दक्षिण कोरिया, चीन, पोलंड येथे याआधी थिएटर आॅलिंपिक्स झाली होती.१५ मराठी नाटकेयंदाच्या थिएटर आॅलिंपिक्समध्ये दिल्लीमध्ये पंधरा मराठी नाटके सादर होणार आहेत. पुण्या-मुंबईसोबतच नाशिक, सांगली, औरंगाबादमधूनही नाटकांचे संघ येत आहेत. महेश एलकुंचवार, सतीश आळेकर यांसारख्या दिग्गज नाटककारांच्या नाटकांसोबतच नवीन नाटककारांचीही नाटके महोत्सवामध्ये सादर होतील. बंगाली नाटकेही मोठ्या संख्येने सादर होणार आहेत.'थिएटर आॅलिम्पिक्स'ची वैशिष्ट्येतब्बल ५१ दिवसांत आगरतळा, अहमदाबाद, बेंगळुरू, मुंबई, भोपाळ, भुवनेश्वर, पटना, तिरुअनंतपुरम, वाराणसी, जयपूर , कोलकाता, इंफाळ, गुवाहटी, जम्मू, चंदीगढ, चेन्नई येथेही नाट्यप्रयोग होती. नाट्यकलेशी संबंधित परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्यानांचाही त्यात समावेश असेल. ‘लिव्हिंग लिजेंड’ मध्ये दिग्गजांशी संवाद साधता येईल, तर ‘मास्टर क्लासेस’मधून नाट्यकलेचे बारकावे जाणून घेता येतील.पाकिस्तानचा सहभाग नाही!आॅलिम्पिक्समध्ये अगदी अझरबैजान, लिथुआनिआ, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशमधूनही नाटके येणार आहेत. मात्र, शेजारी देश पाकिस्तानचा मात्र सहभाग नाही. पाकिस्तानमधूनही प्रवेशिका आल्या होत्या. मात्र, त्यांची निवड होऊ शकली नाही, असेही वामन केंद्रे म्हणाले.
दिल्लीत होणार थिएटर आॅलिम्पिक्स! ३0 देशांचा सहभाग; २५ हजारांहून अधिक कलाकार येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 2:20 AM