नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात असणाऱ्या जैन यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती मिळत आहे. जैन यांच्या स्वयंपाक घरातील आणि बाथरुममधील नळ तसेच शोभेच्या वस्तूही चोरांनी लंपास केल्या आहेत. सत्येंद्र यांनी रविवारी (22 सप्टेंबर) ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचे घर आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे घर बंद आहे. सत्येंद्र जैन यांच्या शेजाऱ्यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास जैन यांच्या घराचा गेट उघडा असल्याचं पाहिलं. त्यांनी त्वरीत याबाबत जैन कुटुंबीयांना माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबीय तातडीने घरी दाखल झाले. त्यावेळी त्यांना घरातील सामान अस्थावस्थ पडलेले दिसले. तसेच काही सामान चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर या प्रकरणी जैन यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आरोग्यमंत्री जैन यांनी चोरीच्या घटनेनंतर आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले आहे. यामध्ये दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात असणाऱ्या त्यांच्या घराचे काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये घरातील सामान अस्थावस्थ पडलेले दिसत आहे. दिल्लीतील चोरांना पोलिसांची भीती राहिलेली नाही असं ही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबरच्या रात्री सरस्वती विहारमधील एका घरात चोरी झाल्याची माहिती पोलीस पीसीआरला मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी चौकशी केली असता हे घर आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचे असल्याचे समजले. जैन यांच्या स्वयंपाक घरातील आणि बाथरुममधील नळ चोरीला गेले आहेत. तसेच जैन यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात काही शोभेच्या वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या. त्यांचीही चोरी झाली आहे. याप्रकरणी जैन यांच्या पत्नीने तक्रार केली असून दिल्ली पोलीस अधिक तपास करत आहे.