ऑनलाइन लोकमत
अलीगड, दि. 13 - पतीसहीत सासरची मंडळी घरात प्रवेश देत नसल्याने संतापलेल्या एका मुस्लिम महिलेनं त्यांना हिंदू धर्म स्वीकारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. बुलंदशहर येथे राहणारी रिहाना (30) हिचा निकाह 2012 मध्ये जमालपूर येथील मोहम्मद शरीफसोबत झाला होता. काही महिन्यानंतर पतीसोबत सतत वाद होऊ लागल्यानं रिहाना आपल्या 4 वर्षांच्या मुलीसह माहेर निघून गेली.
यानंतर मंगळवारी ती पुन्हा सासरी परतली, तेव्हा सासरची मंडळी तिला घरात घेतच नव्हते. यामुळे तिनं घराच्या दारातच ठाण मांडला. यानंतर बुधवारी हिंदू महासभेचे काही स्थानिक नेते तिच्या मदतीसाठी जमालपूर येथे दाखल झाले. यामुळे या परिसरात आणखी तणाव निर्माण झाला. दरम्यान, हे प्रकरण ट्रिपल तलाकचं नसल्याचे रिहानाने स्पष्ट केले आगे.
दीड वर्षात ट्रिपल तलाक प्रथा बंद?
तर दुसरीकडे, अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड येत्या 18 महिन्यांत ट्रिपल तलाकची प्रथा बंद करणार आहे, त्यामुळे सरकारला यात हस्तक्षेप करावा लागणार नाही, असे लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष कलबे सादिक यांननी स्पष्ट केले आहे. याचे भारतीय मुस्लिम महिला आंदोलनानं स्वागत केले आहे. पण यासाठी 18 महिन्यांचा कालावधी का हवाय, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
ट्रिपल तलाक
कुराणामुसार आधी तलाक दिल्यानंतर व्यक्तीला आपल्या या निर्णयावर विचार करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात येतो. यानंतरही जर तो आपल्या निर्णयावर कायम असेल तर अजून दोन वेळा तलाक बोलल्यास तलाक दिला असं मानलं जातं. अनेक इस्लामिक देशांमध्ये ही परंपरा बंद करण्यात आली आहे. मात्र भारतात अद्यापही या प्रथेचं पालन केलं जातं.
ट्रिपल तलाक प्रकरण खंडपीठाकडे, 11 मेपासून सुनावणी
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या ट्रिपल तलाक प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने आज पाच सदस्यीय खंडपीठाकडे सोपवली. सर्वोच्च न्यायालयाचेसरन्यायाधीश खेहर यांच्या खंडपीठासमोर तिहेरी तलाकप्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी त्यांनी हा निर्णय सुनावला.
ट्रिपल तलाक प्रकरणी फक्त कायदेशीर मुद्द्यावरच सुनावणी होईल. सर्व पक्षकारांची बाजू न्यायालय विचारात घेईल. ट्रिपल तलाक, बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला प्रकरणी येणाऱ्या याचिकांवर खंडपीठाकडे सुनावणी होईल. ही सुनावणी 11 मेपासून घेण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश खेहर यांच्या खंडपीठाने सांगितले.
हत्या होण्यापेक्षा, तीन शब्द बरे...
वैयक्तिक कायदे हे घटनेचे उल्लंघन करणारे आहेत असे म्हणून त्यांना आव्हान देता येत नाही. जेव्हा वैवाहिक संबंधांत बेबनाव निर्माण होतो आणि पतीला पत्नीपासून विभक्त व्हावे वाटू लागते, तेव्हा वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि पती विभक्त होण्यासाठी पत्नीची हत्याही करू शकतो. अशा स्थितीत तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून पत्नीला तलाक देणे हा उत्तम मार्ग आहे, असे या मुस्लिम बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.