राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी राज्यात प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू असतानाच भाजपाचे उमेदवार कंवरलाल मीणा यांनी भाषणामधून काँग्रेसचे उमेदवार प्रमोद जैन भाया यांना पाय तोडण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये कंवरलाल मीणा हे कथितपणे सांगत आहेत की, याचा नक्की इलाज होईल. आधीतर मी एक पाय मोडण्याचा विचार केला होता. मात्र आता जनता एवढ्या मोठ्या प्रमाणावर येत आहे ते पाहून गाडी बसल्या बसल्या विचार केला की, आता तर दोन्ही पाय मोडावे लागतील. मात्र या व्हिडीओच्या सत्यतेला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार प्रमोद जैन भाया यांनी सांप्रदायिक तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी आणि एसपी यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाया यांनी आरोप केला की, कंवरलाल मीणा हे एक गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यामध्ये २४ गुन्ह्यांची नोंद आहे. ते सध्या जामिनावर आहेत. त्यांना कायद्याचं कुठलंही भय वाटत नसून ते कायद्याचा सन्मानही करत नाहीत, असा आरोप काँग्रेसे उमेदवार प्रमोद जैन भाया यांनी केला आहे.
भाया पुढे म्हणाले की, कंवरलाल मीणा यांच्यासारख्यांमुळे सर्वसामान्य लोक अडचणीत सापडतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा लोकांपासून दिशाभूल होण्यापासून वाचण्यासाठी सर्वसामान्य लोकांना समजावलं पाहिजे कारण असे लोक कुणाचेही सख्खे नसतात.