अयोध्या - अयोध्येतील राम मंदिराच्या कामास सुरुवात झाली आहे. दरम्यान, राम मंदिराचे काम सुरू झाल्यानंतर पाकिस्तानने त्यावरून भारतावर टीका केली असून, पाकिस्तानच्या या टीकेनंतर साधुसंत संतप्त झाले आहे. पाकिस्तानने आमच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ करू नये. अन्यथा आम्ही इस्लामाबादमध्येच राम मंदिर बांधू, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, राम जन्मभूमी खटल्यात मुस्लिम पक्षकार असलेल्या इक्बाल अंसारी यांनीही पाकिस्तानला चार शब्द सुनावले आहेत.
अयोध्येतील संतांनी सरकारला सांगितले की, पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर दिले गेले पाहिजे. पाकिस्तान भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील मुस्लिमांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केला आहे. आता अयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावे,अशी त्यांचीही इच्छा आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने राम मंदिराच्या बांधकामावरून भारतावर टीका केली होती. एकीकडे जग कोरोनाशी झुंजत असताना आरएसएस आणि भाजपा आपला अजेंडा रेटण्यामध्ये गुंतलेले आहेत. बाबरी मशिदीच्या जागेवर सुरू झालेले मंदिराचे बांधकाम हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पाकिस्तान सरकार आणि येथील लोक त्या कृतीचा निषेध करतो, अशी टीका पाकिस्तानने केली होती.
दरम्यान, बाबरी मशीद खटल्यातील मुस्लीम पक्षकार इक्बाल अंसारी यांनीही राम मंदिराच्या मुद्यावर पाकिस्तानने ढवळाढवळ करू नये असा सल्ला दिला आहे. याबाबत आक्षेप घेणारा पाकिस्तान कोण? आतापर्यंत पाकिस्तानने काहीच चांगलं काम केलेलं नाही, आता काय करणार आहे?