ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर सभेत मतदारांना पैसे घ्या, असे वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना चांगलेच फटकारले आहे. 'आचार संहितेचे उल्लंघन करणं सुरूच ठेवले तर आम आदमी पार्टीविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, या कारवाईत पार्टीची मान्यताही रद्द करण्यात येईल', असा इशारा निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना दिला आहे.
तसंच निवडणुकांच्या प्रचार सभेत भाषण करताना संयम बाळगण्याचा सल्लाही दिला आहे. भविष्यात आचार संहितेचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास 'निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) ऑर्डर अॅक्ट'नुसार तुमच्या आणि पार्टीविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, हे लक्षात ठेवा, असे निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना सांगितले आहे.
यापूर्वी निवडणूक आयोगाने 16 जानेवारी रोजी अरविंद केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.
केजरीवाल यांचे वादग्रस्त विधान
अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील एका निवडणूक प्रचाराच्या सभेदरम्यान लोकांना असे सांगितले होते की 'काँग्रेस आणि भाजपाकडून पैसे घ्या मात्र मत आम आदमी पार्टीला द्या. काँग्रेस आणि भाजपामधील लोकं तुम्हाला पैसे द्यायला येतील. महागाई लक्षात घेता लोकांनी त्यांच्याकडे 5000 रुपयांऐवजी 10,000 रुपयांची नव्या नोटांच्या स्वरुपात मागणी करायला हवी', असे वादग्रस्त वक्तव्य केजरीवाल यांनी केले होते.