हैदराबाद - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश एसटीएफने कुख्यात माफिया अतिक अहमद याचा मुलगा आणि उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद व त्याचा साथीदार गुलाम या दोघांचा एन्काऊंटर करत त्यांना ठार केलं. झाशीमध्ये यूपी एसटीएफचे डेप्युटी एसपी नवेंदू आणि डेप्युटी एसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या दोघांचा खात्मा केला. पोलिसांनी त्यांच्याकडून परदेशी शस्त्रास्त्रेही जप्त केली आहेत. या घटनेवरुन मत-मतांतर व्यक्त होत आहेत. अनेकांनी या एन्काऊंटरचं समर्थन केलंय. मात्र, युपीतील विरोधी पक्ष असलेल्या सपाने आणि एमआयएमने या एन्काऊंटरचा विरोध केला आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्थाच नसल्याचेही म्हटले आहे.
युपीमधील एन्काऊंटरच्या घटनेनंतर देशभरात योगी सरकारच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू आहे. तर, सोशल मीडियावरही योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, त्यांनी मिट्टी मे मिला देंगे असे म्हणत इशारा दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, या घटनेवरुन एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसी यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.
तुम्ही एन्काऊंटर करताना धार्मिक भेद करता, धर्माच्या नावाने तुम्ही एन्काऊंटर करता. जुनैद आणि नसीरला ज्यांनी मारलं, तुम्ही भाजपवाले त्यांचाही एन्काऊंटर करणार का? नाही करणार. कारण, तुम्ही धर्माच्या नावाने एन्काऊंटर करता. जुनैद आणि नसीरच्या हत्येतील केवळ १ आरोपी पकडला, इतर ९ जण गायब आहेत, असे म्हणत एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
तसेच, युपीतील हा एन्काऊंटर नसून इथे कायदा व सुव्यवस्थेची चिरफाड होतेय. तुम्ही संविधानाचा एन्काऊंटर करू इच्छितात, देशात न्यायालये कशासाठी आहेत, सीआरसीपी, आयपीसी कशासाठी आहेत. जर तुम्हीच निर्णय घेणार असाल, बंदुकीच्या गोळीने न्याय करणार असाल, तर मग न्यायालयेच बंद करा, अशा शब्दात खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी राज्यातील एन्काऊंटरच्या घटनेचा तीव्र शब्दात विरोध केला.
अखिलेश यादव यांच्याकडून चौकशीची मागणी
खोटे एन्काऊंटर करुन भाजप सरकार खऱ्या मुद्द्यांपासून दूर पळत आहे. भाजपावाले न्यायालयावर विश्वासच करत नाहीत. आजच्या या एन्काऊंटरचा कसून तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली. तसेच, भाजपा बंधुप्रेम जपण्याविरुद्ध आहे, चूक-बरोबर याचा निर्णय घेण्याचा अधिकार सत्तेचा नाही, असे म्हणत या एन्काऊंटवरच्या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे.
दोघेही जागीच ठार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असद आणि मोहम्मद गुलाम झाशीतील परिछा धरणाजवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला, यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. त्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्या दोघांवर गोळीबार केला, यात दोघेही जागीच ठार झाले. युपी पोलिसांच्या या कारवाईमुळे योगी आदित्यनाथ याचं सरकार पुन्हा चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी, मिट्टी मे मिला देंगें असे म्हणत युपीतील गुंडगिरीला इशाराच दिला होता.