"...तरच सरकारला पूर्ण पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राहुल गांधींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 11:57 AM2024-06-25T11:57:23+5:302024-06-25T11:57:52+5:30
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
Parliament Session 2024 : १८ व्या लोकसभा अध्यक्षपदासाठी अनेक दिवसांपासून अनेक नावांची चर्चा सुरू होती. मात्र आता अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्षांच्या नावावर संसदेत निर्णय होणार आहे. एनडीएकडून ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार बनवण्यात आले आहे. एनडीएच्या मित्रपक्षांनी ओम बिर्ला यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. सत्ताधाऱ्यांकडून ओम बिर्ला यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधकांना विनंती करण्यात आली होती. मात्र विरोधकांनी प्रथेप्रमाणे उपाध्यक्ष पद देण्याची मागणी केली आहे. उपाध्यक्षपद दिल्यास संपूर्ण विरोधी पक्ष ओम बिर्ला यांना पाठिंबा देणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार याबाबतची सस्पेंस आज संपणार आहे. एनडीएकडून लोकसभा अध्यक्षपदासाठीचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. एनडीएकडून ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अर्ज भरणार आहेत. लोकसभा अध्यक्षपदाबाबत एनडीएकडून राजनाथ सिंह यांनी विरोधकांशी चर्चा केली आहे. राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना फोन करुन अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. मात्र विरोधकांनी उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्याच्या अटीवर समर्थन देण्याचे मान्य केले आहे. मात्र याबाबत अद्याप एनडीएकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"राजनाथ सिंह यांचा मल्लिकार्जुन खरगे यांना फोन आला होता आणि त्यांनी सांगितले की तुम्ही आमच्या लोकसभा अध्यक्षांना पाठिंबा द्या. आता आम्ही सगळ्यांसोबत चर्चा केली आहे. सगळ्या विरोधकांनी म्हटलं आहे की, लोकसभा अध्यक्षांना पाठिंबा देणार. पण उपाध्यक्ष पद विरोधकांना मिळायला हवं. राजनाथ सिंह यांनी काल संध्याकाळी खरगेंना सांगितले होते की मी पुन्हा फोन करेल. पण आपापर्यंत राजनाथ सिंह यांनी फोन केलेला नाही. एकीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात की सर्वानुमते निर्णय व्हायला हवा. त्यानंतर आमच्या नेत्याचा अपमान केला जातोय. त्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट नाही. त्यांना कोणताही सर्वानुमते निर्णय नकोय. उपसभापतीपद विरोधकांना द्यायचे ही प्रथा आहे. प्रथा आहे की उपाध्यक्ष हा विरोधकांमधील असायला हवाय. सगळ्या विरोधकांनी म्हटलं आहे की, जर प्रथा पाळली गेली तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पूर्ण समर्थन देऊ. नरेंद्र मोदी बोलतात एक आणि करतात एक. पण यांना हे सगळं बदलावे लागणार आहे," असे राहुल गांधी म्हणाले.
"सगळ्या देशाला माहिती आहे की पंतप्रधान मोदींच्या शब्दाला काही अर्थ नाही. पंतप्रधान बाहेर म्हणतात की सर्वांनी मिळून काम करायला हवं आणि आतमध्ये दुसरं काही करतात. आमच्या नेत्याला पुन्हा फोन करण्यात येईल असे सांगण्यात आलं. आतापर्यंत फोन आलेला नाही," असेही राहुल गांधी म्हणाले.