नवी दिल्ली – युवा अवस्थेत युवकांच्या मनात अनेक विचार येत असतात. तरूण वयात माझ्याही मनात खूप विचार यायचे. २५ व्या वर्षी मनात विचार आला की, या जीवनात काय आहे? कशासाठी आपण जगतोय? इतकचं नाही तर आत्महत्या करण्याचा विचारही माझ्या मनात आला होता. माझं जगणं मला व्यर्थ वाटू लागलं होतं असं विधान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केले आहे.
युवकांमध्ये असलेली कौशल्य क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना नव्यानं संधी देण्यासाठी आशियातील सर्वात प्रतिष्ठीत श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे टेडएक्स कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अजीत बजाज, जावेद अख्तर आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, काही कामानिमित्त मी दिल्लीला आलो होतो. दिल्ली रेल्वे स्टेशनवर असलेल्या एका बुक स्टॉलवर मला स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक दिसलं. मी ते विकत घेतले. ते पुस्तक मी वाचलं आणि मला जीवनाचा अर्थ कळाला असं ते म्हणाले.
या पुस्तकात विवेकानंदांनी लिहिलं होतं की, आपल्या जीवनात ध्येय बनवा. काही तरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा आणि पुढील वाटचाल करा. जेव्हा त्या मार्गावर चालाल तेव्हा अनेकदा अडचणींचा सामना करावा लागेल. बस्स तेव्हाच मला माझ्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. मला देशाची सेवा करायची आहे हे निश्चित केले. त्यानंतर मी माझ्या मार्गावर चालायला लागलो. खूप समस्या आल्या, खाण्यासाठी पैसे नव्हते. बसने प्रवास करायला पैसे नाहीत. परंतु पुढे जात राहिलो. छोटे छोटे प्रयत्न करत राहिलो. त्यात यश मिळालं असं अण्णा हजारेंनी सांगितले.
दरम्यान, युवकांनी धूम्रपान, तंबाखू आणि दारू यासारख्या नशेपासून दूर राहण्याचा सल्ला अण्णांनी दिला. या चांगल्या गोष्टी नाहीत. देशाला युवकांची गरज आहे. देशात अनेक समस्या आहेत ज्याला युवक संपवू शकतात. यावेळी अण्णांनी दिल्लीतील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांचा उल्लेख केला. देशातील विविध क्षेत्राच्या विकासासाठी युवकांची गरज आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचं ध्येय बनवा आणि तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन अण्णा हजारे यांनी युवकांना केले.