काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घेतलेल्या मुलाखतीची सध्या चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांनी या मुलाखतीमध्ये सत्यपाल मलिक यांच्यासोबत मोदी सरकार, पुलवामा हल्ला, शेतकरी आंदोलन, किमान हमीभाव, जातीय जनगणना आणि मणिपूर हिंसाचार आदी विषयांवर चर्चा केला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. याचवेळी राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यावेळी त्यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेबाबतचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
सत्यपाल मलिक यांच्यासोबत पुलवामा हल्ल्याबाबत चर्चा करताना राहुल गांधी यांनी सांगितले की, मी हुतात्म्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा विमानतळावर पोहोचताच सुरक्षेचं कारण देत विमानतळावरील एका खोलीतच मला कोंडून ठेवण्यात आलं. मात्र त्यांनी याचं कारणही सांगितलं.
या मुलाखतीवेळी सत्यपाल मलिक यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचं सरकार निवडून येणार नाही, असं आत्मविश्वासपूर्वक सांगितलं. राहुल गांधींनीही ही मुलाखत सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच ही मुलाखत ईडी-सीबीआयची पळापळ वाढवणार का? असा खोचक प्रश्न विचारला आहे.
राहुल गांधी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसेच या हल्ल्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. हा हल्ला रोखता आला असता, मात्र सरकारच्या बेफिकिरीमुळे हा हल्ला घडला, असा आरोप सत्यपाल मलिक यांनी पुन्हा केला.