ऑनलाइन लोकमतभोपाळ, दि. 17 - एका ट्रॅफिक पोलीस हवालदारानं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना किडनी देण्याची तयारी दर्शवली आहे. सुषमा स्वराज यांची किडनी निकामी झाल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर किडनी देण्यास हात पुढे आले आहेत. "मला त्यांच्या किडनी निकामी झाल्याची बातमी पेपरमध्ये वाचल्यानंतर समजली आहे. जर माझं रक्तगट आणि सुषमा स्वराज यांचं रक्तगट सारखं असल्यास मी त्यांना किडनी देण्यासाठी तयार आहे. मी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना तसा प्रस्तावही दिला आहे," असं ट्रॅफिक पोलीस हवालदार गौरव डांगी यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, सुषमा स्वराज या चांगल्या नेत्या आहेत आणि आम्हाला त्यांची गरज आहे. त्यामुळेच मी त्यांना किडनी देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच डांगी यांनी हा माझा वैयक्तिक निर्णय असून, माझा कोणत्याही राजकीय व्यक्तीशी संबंध आहे, असं सांगितलं आहे. तत्पूर्वी सुषमा स्वराज यांनी ‘किडनी निकामी झाल्याने मी सध्या एम्समध्ये आहे. सध्या डायलिसिस सुरू आहे. प्रत्यारोपणासाठी सध्या काही चाचण्या केल्या जात आहेत. भगवान कृष्ण आशीर्वाद देईल’, ट्विट करून माहिती दिली आहे.
...तर मी सुषमा स्वराज यांना किडनी देण्यास तयार
By admin | Published: November 17, 2016 9:39 PM