निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच स्वत:बाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे. २०२५ ची विधानसभा निवडणूक ते मोठ्या उत्साहाने लढवणार आहेत पण त्याआधी त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की, जर जन सुराजला १३० किंवा १४० जागा मिळाल्या तर ते त्याला आपला पराभव मानतील.
जन सुराजच्या एका अकाऊंटवरून मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. प्रश्नांचं उत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले की, "मी सांगतोय की, मला १३०-१४० जागा मिळाल्या तर मी तो मोठा पराभव मानेन. मी माझ्या आयुष्यातील हा मोठा पराभव मानेन की तीन वर्ष, माझ्या आयुष्यातील सर्व काही, मी माझा अनुभव, माझे प्रयत्न, माझं जीवन पणाला लावलं आहे आणि जर मला १३० जागा मिळाल्या तर मी तो जन सुराजचा पराभव समजेन."
लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार या दोघांनी बिहारचं नुकसान केलं आहे. भाजपा आणि काँग्रेसने या दोघांपेक्षा जास्त बर्बाद केलं आहे. कारण लालू प्रसाद यादव हे स्वबळावर एकदाच बिहार जिंकले हे लोकांना माहीत नाही. नितीश कुमार यांनी आजपर्यंत स्वबळावर बिहार जिंकलेला नाही. या दोन्ही गोष्टी जनतेवर लादण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. काही खासदारांच्या लालसेपोटी काँग्रेसने लालूंना बिहार विकला."
"आज भाजपाही तेच करत आहे. बिहारची जनता नितीश यांच्या हाती गेली आहे" असंही प्रशांत किशोर यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. प्रशांत किशोर गेल्या दोन वर्षांपासून पदयात्रा करत आहेत. जन सुराज पक्षाची २ ऑक्टोबरला स्थापना होणार असून हा पक्ष बिहारमध्ये २४३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. बिहारमधील लोकांना बदल हवा आहे आणि त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असा दावा प्रशांत किशोर सातत्याने करत आहेत.