"...तर सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन"! पत्नीवरील आरोपांवरून आसामचे CM हिमंता स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 06:50 PM2023-09-14T18:50:36+5:302023-09-14T18:51:52+5:30
"आपल्या पत्नीवरील आरोप सिद्ध झाल्यास, आपण सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊ, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे."
काँग्रेसने केलेल्या आरोपांनंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि गौरव गोगोई यांच्यात ट्विटर (आता एक्स) वॉर सुरू झाले आहे. यावर बोलताना, आपल्या पत्नीवरील आरोप सिद्ध झाल्यास, आपण सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊ, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी एका मीडिया आणि मनोरंजन कंपनीसोबत जोडल्या गेल्या आहेत. या कंपनीला अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून एका विशेष केंद्रीय योजनेंतर्गत कर्जाशी संबंधित सबसिडी म्हणून 10 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप काँग्रेससने बुधवारी केला. मात्र बिस्वा सरमा यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.
गौरव गोगोई यांना मुख्यमंत्री सरमांवर निशाणा -
लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते तथा खासदार गौरव गोगोई यांनी एक्सवर पोस्ट करत, "भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान संपदा योजना सुरू केली आहे. पण आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून, आपल्या पत्नीच्याच कंपनीला कर्जाशी संबंधित सब्सिडीचा भाग म्हणून 10 कोटी रुपये देण्यास मदत केली," असा आरोप केला आहे. एवढेच नाही तर, "केंद्र सरकारच्या योजना भाजपला समृद्ध करण्यासाठी आहेत का?" असा सवालही त्यांनी केला आहे.
हिमंता बिस्व सरमा यांचा पलटवार -
यावर उत्तर देत, हिमंता बिस्व सरमा यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे, "जर पत्नीच्या कंपनीला केंद्राची सब्सिडी मळाल्याचे आरोप सिद्ध झाल्यास, आपण सार्वजनिक जीवनातून सन्यास घेऊ." मुख्यमंत्री सरमा यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळत, आपली कंपनी ज्या कंपनीशी जोडली गेली आहे, त्या कंपनीला कसल्याही प्रकारची सब्सिडी मिळाली नसल्याचेही सरमा यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, काँग्रेसने काही कागदपत्रांच्या माध्यमाने दावा केला होता की, 2021 मध्ये सरमा मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांच्या पत्नी रिंकी भुइंया सरमा यांच्या कंपनीने आसामच्या नौगांवमध्ये 50 बिघे शेतजमीन खरेदी केली होती आणि काही दिवसांतच या जमिनीचे औद्योगिक जमिनीत रूपांतर करण्यात आले.