"...तर मी विनेश फोगटला राज्यसभेवर पाठवलं असतं", काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 04:21 PM2024-08-08T16:21:02+5:302024-08-08T16:27:51+5:30
Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या कुस्तीतून निवृत्तीवर काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरलेल्या विनेश फोगाट हिला वजनी गटापेक्षा अधिक वजन भरल्याने स्पर्धेतून काल अपात्र ठरवण्यात आलं. या घटनेमुळं भारताचं स्पर्धेतील एक हक्काचं पदक हुकल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. ५० किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटचं काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. या घटनेनंतर विनेश फोगटनं कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या कुस्तीतून निवृत्तीवर काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनेश फोगटला सुवर्ण पदक मिळालं पाहिजे. यासाठी ती हक्कदार आहे, याकडं सरकारनं लक्ष द्यावं. अशा प्रकारे अपात्र ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे, असं सांगत भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी आपल्याकडे संख्याबळ असते तर मी विनेश फोगटला राज्यसभेवर पाठवलं असतं, असं म्हटलं आहे.
महिलांच्या ५० किलो कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी वजन जास्त आढळल्याने विनेश फोगटला बुधवारी ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेश फोगटनं कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. ती म्हणाली की, "आई, कुस्ती माझ्याकडून जिंकली, मी हरली. माफ कर, तुझं स्वप्न, माझं धैर्य, सर्व काही तुटलं, आता माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. कुस्ती २००१-२०१४ ला अलविदा. मी आपल्या सर्वांची सदैव ऋणी राहीन."
भारतीय कुस्ती संघाने केली होती अपील
विनेश फोगाटचं वजन फायनल मॅचपूर्वी १०० ग्रॅम अधिक आढळलं, ज्यामुळे विनेशला स्पर्धेतून अपात्र घोषित करण्यात आले. याबाबत भारतीय कुस्ती संघाकडून अपील करण्यात आलं होतं. विनेशला आणखी थोडा वेळ आणि सूट दिली जावी असं भारतानं म्हटलं. तर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन IOA ने विनेश रात्रभर तिचं वजन नियंत्रित करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत होती, परंतु सकाळी तिचं वजन १०० ग्रॅम अधिक असल्याचं निदर्शनास आलं.