नवी दिल्ली : तिन्ही भारतीय सैन्यदलांनी संयुक्तपणे समन्वय ठेवून काम केल्यास कोणतेही युद्ध जिंकता येईल, असा विश्वास हवाईदलाचे प्रमुख बी एस धनोआ यांनी व्यक्त केला. यासाठी तिन्ही सेनादलांना सामंजस्याने काम करावे लागेल असे त्यांनी सांगितले.
धनोआ यांनी सांगितले की, हवाई दल इतर दोन्ही दलांसोबत समन्वयाने योजना आखण्याच्या बाजुने आहे. भारताकडे अशी कोणतीही प्रणाली विकसित केलेली नाही. यामुळे भविष्यात ती करावी लागेल. युद्ध सुरु झाल्यास कोणतीही एक सेना ते जिंकू शकत नाही. यासाठी भूदलाला नौसेनेची किंवा हवाई दलाची मदत घ्यावीच लागेल. यामुळे तिन्ही दलांमध्ये समन्वयासोबतच एखाद्या युद्धाबाबत एकत्रित योजना बनविण्याची, सल्लामसलत करण्याची प्रणाली विकसित करावी लागेल.
हवाईदल हे एकमेव असे आहे ज्याचे अधिकारी थेट नियुक्त केले जातात. हेच दल भूदल आणि नौसेनेला राजकीय नेत्यांकडून आखून दिलेल्या धोरणांवर चालण्यास योग्य बनविते, असेही धनोआ म्हणाले.
महत्वाचे म्हणजे केंद्र सरकार आणि तिन्ही सेनांदलांदरम्यान चर्चा सुरु आहे. तिन्ही दलांदरम्यान समन्वय साधण्यासाठी एखादी यंत्रणा उभारण्यावर यामध्ये विचार सुरु आहे. अमेरिकेसह अनेक पश्चिमेकडील देशांमध्ये अशी यंत्रणा आहे.