नवी दिल्ली : ज्योतिरादित्य सिंदिया पक्षामध्ये राहिले असते, तर ते आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले असते, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे केले. त्यावर आपण काँग्रेसमध्ये होतो, तेव्हा मला मुख्यमंत्री करण्याचा विचार का केला नाही, असा टोला सिंदिया यांनी लगावला. युवक काँग्रेसच्या मेळाव्यात राहुल गांधी म्हणाले की, सिंदिया पक्षात राहिले असते, तर मुख्यमंत्री झाले असते. आज त्यांना राज्यसभेत मागील बाकांवर बसण्याची वेळ आली आहे.
ज्योतिरादित्य सिंदिया यांनी गेल्या वर्षी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा का नाही सुचले? राहुल गांधी यांच्या वक्तव्याविषयी विचारता, सिंदिया म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधी यांना हे सुचायला हवे होते. ते जे आज सांगत आहेत, ते मी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी करून दाखवले असते, तर परिस्थिती वेगळी असती. ही काळजी त्यांनी तेव्हा करायला हवी होती.