नवी दिल्लीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस ) प्रमुख मोहन भागवत यांच्या हिंदू-मुस्लिम एकतेवर केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला. मध्यप्रदेशातील सीहोरमध्ये माध्यमाशी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले की, जर हिंदु आणि मुस्लिमांचा डीएनए एक आहे, तर धर्म परिवर्तन आणि लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याची काय गरज आहे ? तसेच, त्यांनी मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवैसींचा डीएनएदेखील एकच असल्याचे म्हटले.
सर्व भारतीयांचा डीएनए एकचमुस्लिम राष्ट्रीय मंचाने रविवार(दि.4) रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचे म्हटले होते. तसेच, हिंदू-मुस्लीम ऐक्य भ्रामक आहे. कारण, हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नसून एकच आहेत. पुजा करण्याच्या पद्धतीवरुन लोकांमध्ये भेदभाव करता येत नाही. भारतात हिंदू किंवा मुस्लिमांचे नाही, तर भारतीयांचे प्रभुत्व असू शकते, असेही भागवत म्हणाले होते.
यापूर्वीही दिग्विजय सिंहांनी साधला निशाणाआरएसएस प्रमुखांच्या वक्तव्यावर दिग्विजय सिंह यांनी यापूर्वीही निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, जर तुम्ही बोललेल्या वक्तव्यावर ठाम असाल, तर ज्यांनी निर्दोष मुस्लिमांना त्रास दिला, त्यांना आपल्या पदावरुन तात्काळ हटवा. सुरुवात नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यापासून करा. भागवत जी हे विचार तुम्ही तुमच्या शिष्य, प्रचारक, विश्व हिंदू परिषद/ बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनाही देणार का ?, असा सवालही त्यांनी केला होता.