भाजपचे फायरब्रँड, अनेकदा आपल्याच पक्षाविरोधात कारवाया करणारे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एनएसए अजित डोवाल यांना हटवण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास पंतप्रधान मोदींना 2023 च्या मध्यात पद सोडावे लागू शकते, असा इशारा स्वामी यांनी दिला आहे. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
पेगासस टेलिफोन टॅपिंगसारखी चूक डोवाल यांनी अनेकदा केली आहे, असे सांगताना स्वामी यांनी अजित डोवाल यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच मोदींनी डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून काढून टाकावे, असेही म्हटले आहे. अदानी समूहाच्या संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करायला हवे, असेही स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
काँग्रेसने अदानीशी कधीच करार केला नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना सुब्रमण्यम स्वामी यांनी हे म्हटले होते. मी त्यांच्यापैकी अनेकांना ओळखतो ज्यांचे अदानीसोबत अनेक सौदे आहेत, पण मला काँग्रेसची पर्वा नाही. भाजपचे पावित्र्य अबाधित रहावे, अशी माझी इच्छा आहे, असे स्वामी म्हणाले होते.
डोवाल यांच्याबाबत स्वामी नेमके काय म्हणाले...''मोदींनी डोवाल यांना त्यांच्या NSA पदावरून हटवले पाहिजे. पेगासस टेलिफोन टॅपिंग आणि वॉशिंग्टन डीसी मधून येणार्या आणखी एक भयानक गोष्टींसह त्यांनी बर्याच वेळा मूर्खपणा केला आहे. अन्यथा २०२३ च्या मध्यापर्यंत मोदींनाही पद सोडावे लागेल.'', असे ट्विट स्वामी यांनी केले आहे.