मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी, साध्वी यांच्या उमवेदवारीचे फडणवीस यांनी समर्थन केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तराचा संदर्भ देत, हिंदू संस्कृतीविरुद्ध षड्यंत्र रचणाऱ्यांना हे उत्तर असल्याचंही फडणवीस यांनी म्हटले. तर, प्रज्ञा ठाकूर यांच्यावरील अत्याचारसंदर्भात एटीएसची केस नव्याने खोलण्याचे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिले आहेत.
देशातील हिंदूंना बदनाम करण्याचा डाव आखल्यास, हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केल्यास, तसा नॅरेटीव्ह तयार केल्यास त्यांना उत्तर द्यावेच लागेल. हिंदूंना दहशतवादी बनविण्याची स्क्रीप्ट कोणी लिहित असेल, तर त्यास उत्तर मिळणारच. त्यामुळेच, पंतप्रधान मोदींनीही हिंदू संस्कृतीविरुद्ध डाव आखणाऱ्यांना हे उत्तर असल्याचे म्हटले, असेही फडणवीस यांनी आपल्या मुलाखतीवेळी सांगितले. तसेच, शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वींनी केलेले वक्तव्य चुकीचेच असल्याचेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
2008 च्या अॅफिडेव्हीटमध्ये साध्वींनी आपल्यावरील टॉर्चरसंदर्भात लिहिले होते. मग, आताच का तुम्ही साध्वी प्रज्ञा, साध्वी प्रज्ञा... करत आहात असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. तसेच, तुम्ही साध्वीची केस पुन्हा खोलणार का? असेही विचारण्यात आले. एटीएस आपल्या नियंत्रणात आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञांवर झालेल्या अत्याचाराची फाईल तुम्ही नव्याने खोलणार का? असा प्रश्न फडणवीस यांना विचारला होता. त्यावर उत्तर देताना, जर साध्वी प्रज्ञा यांनी लिखित स्वरुपात तक्रार दिली, तर नक्कीच ती फाईल उघडण्यात येईल. संदर्भातील पुराव्यांचा दाखल घेऊनच ही फाईल उघडू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या टीव्हीवरील किंवा न्यूज चॅनेलवरील मागणीहून नव्हे, तर लिखीत स्वरुपात तक्रार प्राप्त झाल्यास एटीएसच्या तपासाची फाईल नव्याने उघडण्यात येईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतभोपाळ मतदार संघासाठी भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी याचिका कोर्टात करण्यात आली होती. मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उमेदवारी मिळण्यापूर्वी तब्येतीचे कारण पुढे करत एनआयए कोर्टाकडून जामीन मिळवला. त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकाकर्ते नासीर अहमद सय्यद बिलाल यांनी केली होती. मात्र, या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या उमेदवारीला स्थगिती देणे हे कोर्टाचे काम नसून ते निवडणूक आयोगाचे काम आहे. आरोपींना निवडणूक लढण्यापासून न्यायालय रोखू शकत नाही असंही विशेष न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.