ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - भारत सरकार सुरक्षेची पूर्ण खात्री देत नाही तोपर्यंत पाकिस्तानी संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार नाही असे पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री चौधरी निसार अली खान यांनी गुरुवारी सांगितले.
पाकिस्तानने सुरक्षेची चिंता व्यक्त केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी धरमशाळा येथील सामन्याचे नियोजित स्थळ बदलून कोलकात्याला हलवले.
भारताकडून इतका सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर पाकिस्तान विनाकारण सुरक्षेला मुद्दा बनवत आहे. सामन्याचे स्थळ बदलले ही चांगली गोष्ट आहे पण सुरक्षेसंदर्भात भारत सरकारकडून जो प्रतिसाद मिळतोय त्यावर समाधानी नसल्याचे चौधरी निसार अली खान यांनी सांगितले.
पाकिस्तानी संघाला भारतात धोका आहे, काही संघटना खेळात अडथळे आणण्याची धमकी देत आहेत, अशा परिस्थितीत क्रिकेट कसे खेळले जाऊ शकते असे चौधरी निसार अली खान यांचे म्हणणे आहे.