नवी दिल्ली - कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना डोमेस्टीक विमान प्रवासासाठी आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक असणार नाही. देशातील विविध मंत्रालयाचे प्रतिनिधी, स्टेक होल्डर्स आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीतील चर्चेतून हा मुद्दा पुढे आला आहे. नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबतची माहिती दिली. लवकरच, याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
हरदीप पुरी यांनी एएनआयशी बोलताना म्हटले की, ज्या प्रवाशांनी कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. त्या प्रवाशांना डोमेस्टीक म्हणजे देशांतर्गत विमान प्रवासासाठी निगेटीव्ह आरटी-पीसीआर प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोविड 19 च्या नवीन नियमावलीत ही सूचना केली आहे. देशांतर्गत विमान प्रवासासाठी आरटी-पीसीआर चाचणीच्या निगेटीव्ह असल्याची अट रद्दबातल केली जाऊ शकेल.
आरटी-पीसीआर चाचणीच्या प्रयोगशाळेवर पडणारा भारही या निर्णयामुळे निश्चितच कमी होणार आहे. दरम्यान, एप्रिल ते मे महिन्यात ही चाचणी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, नागरिकांना रिपोर्टही वेळेवर मिळत नसून विलंब होत आहे. हरदीप सिंग यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, मंत्रायलयाकडून या निर्णयाबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. दरम्यान, हा निर्णय घेण्यापूर्वी आरोग्य विभागाील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येईल.