केंद्र सरकारने झारखंडच्या वाट्याचे १.३६ लाख कोटी रुपये दिले नाहीत तर अख्खा देश अंधारात जाईल, अशी निर्वाणीचा इशारा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या ५३ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सभेत त्यांनी हा इशारा दिला आहे.
राज्याचा पैसा मिळण्यासाठी सध्या पत्रव्यवहार सुरु आहे. संदेशही पाठविलेला आहे. आमच्या हक्काचा पैसा दिला नाही तर केंद्र सरकारविरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत. याचबरोबर कोळसा खाणी देखील बंद करू. यामुळे संपूर्ण देश अंधारात बुडेल. केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक आता झारखंड सहन करणार नाही, असा इशाराच सोरेन यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी कोळसा मंत्री झारखंडमध्ये आले होते. त्यांच्याशी चर्चा झाली. झारखंडमध्ये जमिनीचा दर जास्त आहे, तो कमी केला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. यावर मी त्यांना खडसावले, जमीन आमची आहे तर आम्हाला जेवढा दर वाटेल तेवढाच राहिल. कोळसा कंपन्यांनी ज्या खाणींमधून उत्खनन बंद केले आहे त्या जमिनी मालकांना परत द्याव्यात, अशीही मागणी केल्याचे सोरेन म्हणाले.
या जमिनी परत दिल्या नाहीत तर आम्ही त्या जमिनींवर कब्जा करू, केंद्राने अर्थसंकल्पात झारखंडला काही दिलेले नाही. मनरेगाची रक्कम कमी केली आहे. ५० लाख कोटींच्या बजेटमध्ये केंद्राला १२ लाख कोटी रुपये व्याजासह परत करावे लागणार आहेत, अशी टीकाही सोरेन यांनी केली.
कोळसा क्षेत्रात उत्खनन करणाऱ्या आउटसोर्सिंग कंपन्या कोळशाची लूट करत आहेत. स्थानिकांना रोजगार दिला जात नाही. इतर राज्यातील लोक काम करत आहेत आणि स्वतःला झारखंडचे मालक मानत आहेत, अशी टीका मंत्री हाफिजुल हसन यांनी केली.